आठ दिवसांपासून पाईप लाईनला गळती
। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालय गेल्या आठ दिवसांपासून पाण्याविना अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे रुग्णालयातील कर्मचार्यांसह रुग्णांच्या नातेवाईकांचे प्रचंड हाल होत असल्याचे कर्मचार्यांकडून सांगण्यात आले आहे. पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या पाईप लाईन लिकेज झाली असल्याने हा त्रास होत असल्याची माहीती समोर येत आहे. मात्र, त्याची दुरुस्ती करण्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा फटका रुग्णांना बसत आहे.
अलिबागमधील जिल्हा सामान्य रुग्णालयात दिवसांला पाचशेहून अधिक रुग्ण उपचारासाठी येत असतात. यातील काही रुग्णांवर उपचार करून लगेच सोडले जाते. तर काहींना अधिक उपचारासाठी दाखल केले जाते. मात्र, जिल्हा रुग्णालयातील बाह्य रुग्ण कक्षातील केस पेपर, सोनोग्राफी, औषध विभाग आदी ठिकाणी पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. या विभागांमध्ये पाणी नसल्याने रुग्णांसह कर्मचार्याची मोठी गैरसोय होत आहे. पाण्याअभावी प्रचंड हाल होत आहेत. याबाबत रुग्णांचे नातेवाईक व कर्मचार्यांनी मुकादम व वरिष्ठ अधिकार्यांबाबत अनेक वेळा तोंडी तक्रारी केल्या आहेत. मात्र, त्या तक्रारीकडे त्यांच्याकडून अक्षम्य दुर्लक्ष झाल्याची माहिती समोर येत आहे.
बाह्य रुग्ण कक्ष असलेल्या इमारतीच्या वरच्या मजल्यावर असलेल्या पाण्याच्या टाकीजवळी पाईप लिकेज झाले आहे. हे पाईप लिकेज असल्याने पाईपद्वारे पाणी पुरवठा होत नाही. त्यामुळे अनेक वेळा रुग्णांसह कर्मचार्यांना बादलीने पाणी ने-आण करावे लागत आहे. रुग्ण प्रशासनाच्या या भोंगळ कारभाराबाबत नागरीकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
डॉ. अंबादास देवमाने
रुग्णालयात पाण्याची समस्या निर्माण झाली असती, तर ती तक्रार माझ्यापर्यंत आली असती. परंतु काही विभागात पाण्याची समस्या असल्यास संबंधित कर्मचार्यांशी संवाद साधून हा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाईल.
जिल्हा शल्यचिकित्सक