कर्नाळा स्पोर्टस् संघ विजेता
। खारेपाट । वार्ताहर ।
अलिबाग तालुक्यातील टाका देवी स्पोर्ट क्लब मांडवा व ग्रामस्थ मंडळ आयोजित जिल्हास्तरीय महिला कबड्डी स्पर्धेत स्वर्गीय रुची पाटील चषक 2024 चा मानकरी कर्नाळा स्पोर्ट क्लब पनवेल हा संघ ठरला. तर, टाकादेवी स्पोर्ट क्लब मांडवा उपविजेता तसेच ओंकार वेश्वी संघ तृतीय क्रमांक व भिलालेश्वर किहीम संघ चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरला.
या स्पर्धा रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने टाकादेवी क्रीडा नगरीत संपन्न झाल्या. स्पर्धेत उत्कृष्ट चढाई ईशा पाटील वेश्वी, मालिकावीर तेजा सकपाल कर्नाळा स्पोर्टस्, उत्कृष्ट पकड चैताली म्हात्रे कीहिम, पब्लिक हिरो नमिषा म्हात्रे टाका देवी स्पोर्ट मांडवा यांना मान्यवरांच्या हस्ते आकर्षक पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. यावेळी स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील नामवंत सोळा संघ सहभागी झाले होते. प्रत्येक संघातील खेळाडूंची निवड करून त्यांना सामनावीर पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.