तटकरेंनी पुरविले जिल्हाध्यक्षांचे ‘लाड’

आगामी निवडणुका होणार भाऊंच्या नेतृत्वाखाली ; अंतर्गत नाराजी दुर
नेरळ | प्रतिनिधी |
जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिलेले माजी आमदार सुरेश लाड यांचे बंड तिसर्‍या दिवशी शमले आहे.राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी पुढाकार घेऊन सुरेश लाड यांची महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेनेबाबत असलेली नाराजी दूर केली आहे.आगामी काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष सुरेश लाड यांच्या नेतृत्वाखाली लढल्या जाणार आहेत, असे राष्ट्रवादी काँग्रेस कडून जाहीर करण्यात आले आहे.

मित्रपक्षांसमवेत आघाडी
आगामी नगरपंचायत,नगरपरिषदा आणि जिल्हा परिषद- पंचायत समित्यांच्या निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या परंपरागत मित्र पक्षांना सोबत घेऊन लढणार असून महाविकास आघाडी मधील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेसोबत युती करणार नाही, या अटीवर सुरेश लाड यांनी राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष पदाचा पदभार पुन्हा स्वीकारत असल्याचे जाहीर केले.

बुधवारी खा. सुनील तटकरे यांनी कर्जत आणि खालापूर तालुक्यातील पक्षाच्या नेत्यांना मुंबई येथे बोलावून घेतले आणि त्यांच्यासोबत चर्चा सुरु केली.रात्री उशिरा सर्व मंडळी मुंबई येथून कर्जत खालापुरात पोहचली आणि गुरुवारी 25 नोव्हेंबर रोजी सुरेश लाड यांना सोबत घेऊन पनवेल येथे पोहोचले.पनवेल येथील एका हॉटेलमध्ये सुनील तटकरे, सुरेश लाड यांच्यात बैठक झाली.त्यावेळी सुरेश लाड यांच्या सर्व बाबीं समजून घेत तटकरे यांनी आगामी काळात पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून त्या त्या विषयांवर सकारात्मक चर्चा केली जाईल, असे आश्‍वासन दिले.
यावेळी जेष्ठ नेते हनुमंत पिंगळे, जि.प. उपाध्यक्ष सुधाकर घारे, तानाजी चव्हाण, एकनाथ धुळे अंकित साखरे, भगवान चंचे, नरेश पाटील, एच के पाटील,संतोष बैलमारे,तसेच शरद लाड,संदीप मुंढे, कैलाश घारे,संतोष थोरवे आदी उपस्थित होते.

Exit mobile version