जिल्हाभरात पर्यटकांवरील भ्याड हल्ल्याचा निषेध

अनेक ठिकाणी कँडल मार्च, मशाल रॅली

| रायगड | प्रतिनिधी |

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे फिरण्यास गेलेल्या पर्यटकांवर पाकिस्तानी अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात 27 जणांचा मृत्यू झाला आहे. याचे पडसाद रायगड जिल्ह्यात उमटले असून, सर्व समाजबांधवांनी रस्त्यावर उतरुन या अतिरेकी हल्ल्याचा निषेध व्यक्त केला. अनेक ठिकाणी कँडल मार्च, मशाल रॅली काढून पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणादेखील देण्यात आल्या. दरम्यान, या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या निष्पापांना उपस्थितांकडून श्रद्धांजलीदेखील वाहण्यात आली.

महाड, पोलादपूर मुस्लिम समाजाकडून निषेध

महाड, पोलादपूरमधील मुस्लिम समाजाने दहशतवादी हल्ल्याचा जाहीर निषेध केला. महाडच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात सायंकाळी साडेचार वाजता महाड पोलादपूर मुस्लिम समाजाच्या प्रमुख पदाधिकारी मौलाना यांनी एकत्र येऊन हत्याकांडाविरोधात आपल्या स्पष्ट भावना व्यक्त केल्या. याप्रसंगी बोलताना महाडचे माजी नगराध्यक्ष मोहम्मद अली पल्लवकर यांनी या हत्याकांडाचा तीव्र निषेध करून पाकिस्तानला या जगाच्या नकाशावरून आता संपवण्याची वेळ आल्याचे मत व्यक्त केले.

मौलाना मुजफ्फर सनगे यांनी आपल्या श्रद्धांजलीपर भाषणात या हत्याकांडाचा निषेध करून हिंदू व मुस्लिम समाजामध्ये यामुळे कोणत्याही प्रकारचा वाद निर्माण होणार नाही व आम्ही देशवासीय एकच आहोत असे सांगून या हत्याकांडामध्ये शहीद झालेल्या सर्वांना श्रद्धांजली अर्पित केली. माजी नगराध्यक्ष मेहबूब कडवेकर यांनी झालेले हे हत्याकांड हे दुर्दैवी व पाचवी असून शासनाने या सर्वांना कठोर शिक्षा करावी अशी मागणी केली. उद्योजक अख्तर पठाण यांनी या हत्याकांडाचा तीव्र निषेध केला.

याप्रसंगी मोहम्मद अली पल्लवकर, वजीर कोंडीवकर, बशीर चिचकर, असलम पानसरे, अकबर तरे, मुखत्यार तरे, मन्सूर ताज, मौलाना मुजफ्फर संगे,अख्तर पठाण,इमरान पठाण, निसार ढोकले निसार दरेखान, अख्तर लंबाडे शोएब पाचकर,सोहेल कादरी, मौलाना मुफ्ती अजगर, मेहबूब कडवेकर, दिलदार पुरकर, सलमान सवेल इलियास ढोकले, अकिब पठाण अल्ताफ काझी, डॉक्टर इमरान अंतुले आदी प्रमुख पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

केंद्र सरकार करारा जबाब देईल : गोगावले

पहलगाम येथे अतिरेक्यांनी पर्यटकांचे केलेले हत्याकांड अमानवी आणि नृशंस असल्याची प्रतिक्रिया राज्याचे रोजगार हमी, फलोत्पादन आणि खारभूमी विकासमंत्री भरत गोगावले यांनी दिली आहे.


या दहशतवादी हल्ल्यात पनवेल येथील रहिवासी दिलीप देसले यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मंत्री गोगावले यांनी पनवेल येथे देसले परिवाराची भेट घेतली आणि सांत्वन केले. त्यानंतर महाडला आल्यानंतर त्यांनी या घटनेवर माध्यमांसमोर भाष्य केले. ज्या पध्दतीने अतिरेक्यांनी हे हत्याकांड केले त्याचे वर्णन अंगावर शहारे आणणारे आणि स्वतःला भारतीय म्हणवणार्‍या प्रत्येक माणसाचे रक्त खवळायला लावणारे असेच आहे. या हत्याकांडाचा बदला घेतला जावा ही प्रत्येक भारतीयाची भावना आहे, असे मंत्री गोगावले म्हणाले.

पोयनाडमध्ये ग्रामस्थांचा कँडल मार्च

अलिबाग तालुक्यातील पोयनाड येथे ग्रामस्थांनी एकत्र येत जम्मू-काश्मीर येथील पहलगाम येथील पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी भ्याड हल्ल्याचा निषेध केला. दरम्यान, ग्रामस्थ, वारकरी संप्रदाय, बाजारपेठेतील व्यापार्‍यांकडून शुक्रवारी मूक मोर्चाचे आयोजन सायंकाळी पाच वाजता करण्यात आले होते.

यावेळी दीपक चवरकर भूषण चवरकर, सुनील पाटील, विक्रम जैन, रमेश तावडे, जनार्दन पाटील गुरुजी, ललित जैन, राजेंद्र तावडे, पद्माकर म्हात्रे, गोरखनाथ पाटील, नंदकुमार पाटील, देवव्रत पाटील, किशोर तावडे, शैलेश गायकवाड, मनीष अग्रवाल, संजय जोशी, देवेंद्र केळुस्कर, अनिता गंभीर, किशोर सुपे यांच्यासह असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते. पोयनाड नाका ते जैन मंदिर पोयनाड इथून या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. दम्यान, या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या सर्वांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

माणगावात सर्वपक्षीय मशाल मोर्चा

माणगाव शहरात बालाजी कॉम्प्लेक्स ते वीर शहीद यशवंतराव घाडगे स्मारक असा सर्वपक्षीय मशाल मोर्चा भाजप युवा मोर्चा माध्यमातून काढण्यात आला.

या मोर्चाला माजी नगराध्यक्ष आनंद यादव, भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष निलेश थोरे, शिवसेना तालुकाप्रमुख गजानन अधिकारी, अल्ताफ धनसे, मोर्बा सरपंच शौकत रोहेकर यांच्यासह माणगाव तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी व माणगावकर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले.

नेरळमध्ये मोर्चाला मोठी गर्दी

पर्यटकांवरील दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी नेरळ गावात हिंदू सकल समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मोठ्या प्रमाणात हिंदू लोकांचा सहभाग होता आणि मोठी गर्दीदेखील झाली होती.


येथील मारुती मंदिर येथून निघालेल्या मोर्चामध्ये शेकडो हिंदू सहभागी झाले होते. माथेरान नेरळ रस्त्याने हा मोर्चा नेरळ रेल्वे स्टेशन येथे तहकूब करण्यात आला. सुरुवातीला मूक मोर्चा म्हणून मोर्चाचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, उत्स्फूर्तपणे निघालेल्या मोर्चामध्ये महिलावर्गाने सुरुवातीला पाकिस्तानविरोधी घोषणा देण्यास सुरुवात केली. सकल हिंदू यांच्यावतीने बजरंग दलाचे कार्यकर्ते राष्ट्रीय नेते अ‍ॅड दीपक गायकवाड यांनी आपली रोखठोक आणि आक्रमकपणे मांडली. पाकिस्तान हरल्यावर त्यांना अन्न गोड लागत नसल्याने अशा लोकांच्या नांग्या ठेचण्यासाठी आपण त्यांची आर्थिक कोंडी करूया असे आवाहन अ‍ॅड. गायकवाड यांनी केले. यावेळी कायदा सुव्यवस्था यांचा प्रश्‍न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

‘भ्याड हल्लेखोरांना फाशी द्या’

उरण तालुका मराठी पत्रकार संघाने या हल्ल्याचा तीव्र निषेध करत हल्लेखोर अतिरेक्यांना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी करणारे निवेदन तहसीलदार उद्धव कदम यांच्याकडे सादर केले आहे.

शासनाने या अतिरेक्यांना पकडून तात्काळ फाशी देण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष घन:श्याम कडू, उपाध्यक्ष विरेश मोडखरकर, दिलीप कडू, सचिव अजित पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

काही तास कोलाड बाजारपेठ बंद

पर्यटकांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ मुंबई-गोवा महामार्गावरील कोलाड हद्दीत सकळ हिंदू समाजातर्फे कोलाड नाका बाजारपेठ बंद ठेवून निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या.


कोलाड हद्दीत अंबर सावंत मंदिर ते आंबेवाडी चौक येथे शुक्रवार, दि.25 एप्रिल रोजी सकळ हिंदू समाजातर्फे एकत्र येत या घटनेचा निषेध व्यक्त करीत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तर, कोलाड नाक्यावरील व रोहा रोड आंबेवाडी नाक्यावरील सर्व दुकाने सकाळी 9 ते 11 पर्यंत बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती. यावेळी कोलाड पंचक्रोशीतील सर्व बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तळा येथे निषेध रॅली

तळा शहरातदेखील सर्व धर्म व सकल हिंदू समाजातर्फे बळीचा नाका ते मारुती मंदिर अशी रॅली काढून पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणा देत पाकिस्तानचा झेंडा पायदळी तुडवून निषेध नोंदविण्यात आला.

यावेळी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच अतिरेक्यांवर ठोस कारवाई करण्याची मागणीदेखील यावेळी करण्यात आली. याप्रसंगी सर्वपक्षीय पदाधिकारी, व्यापारी, तसेच तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version