| दिघी | प्रतिनिधी |
श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन परिसरात विविध सामाजिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमात अग्रेसर असणाऱ्या गणेश पेठ खोती मंडळानी दिवेआगर समुद्रकिनारी रविवारी स्वच्छता केली.
गेल्या काही दिवसामध्ये दीडदिवस, पाचदिवस व दहा दिवसाच्या गणपतीचे विसर्जन या शनिवारपर्यंत करण्यात आले. यावेळी दिवेआगर समुद्रकिनारी दिवेआगर व बोर्लीपंचतन शहरातील हजारो घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन केले गेले. त्यावेळी गणेश मूर्तीबरोबरच मोठ्या प्रमाणात समुद्रात सोडले गेलेले आणि लाटांबरोबर लागलीच दिवेआगर समुद्रकिनारी परत आलेले सर्व निर्माल्य तसेच किनाऱ्यावर साचलेला प्लॅस्टिकचा किंवा अन्य कचरा उचलून त्याचे पुनर्विसर्जन करण्यात आले. एका अर्थी, महिलांनी हा उपक्रम यशस्वी करून अनेकांसाठी एक नवा पायंडा घालून दिला आहे.
गणेश पेठ खोती महीला मंडळातील सभासदांनी मिळून मागील कित्येक वर्षे आपले सामाजिक कार्याचे भान जपले आहे. दरवर्षी मोठ्या प्रमाणात श्री गणेश मूर्तींचे विसर्जन होते, व नंतर दुसऱ्या दिवशी श्री मूर्तींचे भग्न अवशेष किनारी इतरत्र पडलेले असतात. त्याची विटंबना होऊ नये म्हणून या विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी गणेश मूर्तींचे पुनर्विसर्जन करतात. दिवेआगर समुद्र किनारा व आसपासचा परिसर स्वच्छ करुन वेळोवेळी प्रत्यक्ष कृतीद्वारे स्वच्छतेचा संदेश दिला आहे. पर्यावरण पुरक भुमिका सदैव घेत असून, त्यानुसार आम्ही समुद्र किनारा स्वच्छ केला असल्याचे महिलांनी यावेळी सांगितले.
जनजागृती गरजेची
पर्यावरणाला घातक ह्या मूर्ती खरेदी करू नका याबाबत जनजागृती केली जाते पण त्याचा वापर पूर्णपणे बंद होताना दिसत नाही. किनारे स्वच्छ करतात पण जनजागृती होऊन मतपरिवर्तन होणे गरजेचे आहे त्यासाठी सुशिक्षित लोकांनी पुढे येऊन स्वतः शाडूच्या मूर्ती आणणे गरजेचे आहे.







