दिवेआगर सरपंच चषक नारळ फोडी स्पर्धा

| श्रीवर्धन | वार्ताहर |

दिवेआगर येथील म.गो. लिमये विद्यामंदिर मैदानात 16 ऑगस्ट रोजी रंगलेल्या भव्य सरपंच चषक नारळ फोडी स्पर्धेत श्रीवर्धनच्या विक्रांत फुटाणकर यांनी उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांकाचा चषक व रोख रु. 11,000 चे पारितोषिक पटकावले. द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक रु. 7,000 व चषक श्रीवर्धनचे सचिन फुटाणकर यांनी पटकावले, तर उत्कृष्ट फटकेबाज म्हणून नांदगाव मुरुड येथील अनिकेत माळी यांना चषकाने सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेत चौल, रेवदंडा, नागाव, मुरुड, दिवेआगर आणि श्रीवर्धन अशा विविध भागांतील सोळा संघांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता.

विजयी स्पर्धकांना दिवेआगरचे सरपंच विजय तोडणकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना सरपंच विजय तोडणकर म्हणाले, नारळ फोडी हा आपल्या कोकणातील संस्कृती आणि परंपरेचा अविभाज्य भाग आहे. आधुनिकतेच्या प्रवाहात अशा पारंपरिक खेळांना पुनरुज्जीवित करणे आणि तरुण पिढीला एकत्र आणणे हाच या सरपंच चषकाचा मुख्य उद्देश आहे.रायगड जिल्ह्यातील विविध तालुक्यांतून आलेल्या खेळाडूंचा उत्साह आणि शिस्तबद्ध खेळ पाहून अत्यंत आनंद झाला. भविष्यातही या पारंपरिक खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी अशा स्पर्धा मोठ्या प्रमाणावर भरवल्या जातील.

Exit mobile version