पर्यटन बहरल्याने व्यावसायिकांची दिवाळी

रायगड झाले हाऊसफुल्ल
वाहनांच्या रांगाच रांगा
अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
कोरोनाच्या साथीने थंडावलेल्या रायगडातील पर्यटन व्यवसायाला ऐन दिवाळीत चांगलाच बहर आला आहे.यामुळे मरगळलेल्य व्यावसायिकांना दिलासा मिळाला असून,ऐन सणासुदीला पर्यटन बहरल्याने पर्यटनावर अवलंबून असलेल्या सर्वच घटकांची दिवाळी उत्साहात साजरी झाली आहे.गेल्या चार दिवसांपासून अलिबागसहित रायगडातील सर्वच पर्यटन स्थळे हाऊसफुल्ल झालेली आहे.हा बहर आता पुढील काही महिने स्थिर राहण्याची शक्यता व्यावसायिकांकडून वर्तविली जात आहे.
गेल्या दीड वर्षापासून रायगडच्या पर्यटनाला कोरोनाच्या साथीबरोबरच लॉकडाऊनमुळे मरगळ आली होती.पण आता कोरोनाची साथ आटोक्यात येण्याबरोबरच लॉकडाऊनही मोठ्या प्रमाणात शिथिल झालेले आहे.त्यामुळे पर्यटकांची पावलेही आता रायगडच्या पर्यटनस्थळी वळू लागली आहे.त्याचे प्रत्यंतर सध्या सर्वत्र येत आहे.ऐन दिवाळी सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी राज्याच्या कानाकोपर्‍यातून हजारो पर्यटक गेल्या चार दिवसांपासून रायगडमध्ये दाखल झालेले आहेत.

अलिबाग हाऊसफुल्ल
अलिबाग तालुक्यातील सर्वच किनारे पर्यटकांनी ओथंबून गेले असल्याने सर्वत्र उत्साहाचे वातावरण दिसत आहे.विशेष करुन पर्यटनावर अवलंबून असेलल्या सर्वच घटकांना या बहरलेल्या पर्यटनाने मोठा दिलासा दिलेला आहे.तालुक्यातील सर्वच हॉटेल्स,रिसॉर्ट,वाड्या पर्यटकांनी बुकींग केलेल्या आहेत.

माथेरान बहरले
माथेरान मधील मोठा पर्यटन हंगाम असून दीपावली हा पर्यटन हंगामाचे पावसानंतरचे पहिले पर्व असते.पावसाचे चार महिने संपल्यानंतर माथेरानच्या पर्यटनाला खर्‍या अर्थाने सुरुवात होते.या वेळेस सर्व हॉटेल्स,रेस्टॉरंट,दुकाने पर्यटकांच्या गर्दीने फुलून गेले आहे. लॉकडाऊन मुळे पर्यटन क्षेत्राला मोठा फटका बसला यामध्ये माथेरानला तर मोठ्या प्रमाणात याची झळ सोसावी लागली कारण ना शेती ना उद्योगधंदे.

ट्रॅफिक जामचा त्रास
पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे तसेच त्यांच्या विविध वाहनांमुळे रायगडातील सर्वच रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जामचा त्रास सहन करावा लागला.विशेष करुन वडखळ ते अलिबाग,अलिबाग ते मुरुड या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.सायंकाळी परतीच्या पर्यटकांच्या वाहनांचीही भर पडत राहिली.त्यामुळे रात्रीही अनेक ठिकाणी ट्रॅफिक जाम दिसून आले.त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणेला मोठी कसरत करावी लागली.सुदैवाने कुठेही दुर्घटना घडली नाही.


दिवाळी असल्यामुळे गेल्या दोन आठवड्यापासून एसटी गाड्यांना प्रवाशांची खूप गर्दी होती. तसेच दिवाळीनिमित्त ज्या जादा गाड्या सुरु करण्यात आल्या आहेत त्यांना देखील प्रवासी वर्गाकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या जादा गाड्या 14 नोव्हेंबरपर्यंत चालवण्यात येणार आहेत.
-अजय वनारसे, अलिबाग आगार व्यवस्थापक

व्यवसाय पूर्ववत होतोय
कोरोनामुळे कोलमडलेला धंदा पुन्हा पूर्ववत सुरु होत आहे. या आठवडयात पर्यटकांचा प्रतिसादही उत्तम मिळाला,अशी माहिती आवास येथील श्री आशीर्वाद हॉलिडे होमचे मालक सुधाकर राणे,ओमकार राणे यांनी दिली. दरम्यान, यावेळी पर्यटकांच्या चेहेर्‍यावर कमालीचा आनंद दिसत होता. रात्री पडणार्‍या गुलाबी थंडी पर्यटकांना यावेळी अनुभवायला मिळाली. डिसेंबर व नाताळची सुट्टी जवळ आल्यामुळे कॉटेजची बुकिंग व पूर्वतयारी सुरू करण्यात आली आहे,असेही ते म्हणाले.

Exit mobile version