सुधागडात दिवाळी होतेय पर्यावरणपूरक

। पाली/बेणसे । वार्ताहर ।
दिवाळी म्हणजे नवचैतन्य आणि उत्साह देणारा सण. मात्र दिवाळीत फटाके फोडणे व अविघटनशील साहित्याचा वापर यामुळे पर्यावरण दूषित होऊन संपूर्ण सजीव सृष्टीवर प्रतिकूल परिणाम घडतात. मात्र जिल्ह्यात यंदाची दिवाळी अधिक पर्यावरणस्नेही व पर्यावरणपूरक झालेली पहायला मिळत आहे. कारण जिल्ह्यातील बहुसंख्य व्यापारी व ग्राहकांनी प्लास्टिक व चिनी माल नाकारला आहे. सुधागड तालुक्यातील पर्यावरणप्रेमी तरुण अभिजित देशमुख यांनी सांगितले की, जिल्ह्यातील नागरिक पर्यावरणा संदर्भात अधिक सजग आणि संवेदनशील झाले आहेत. सण उत्सवात पर्यावरण संवर्धन कसे होईल याकडे लक्ष देत आहेत. मुंबईला होलसेल बाजाराबरोबरच जिल्ह्यातील स्थानिक बाजारात देखील यंदा पर्यावरण पूरक आकाश कंदील अधिक प्रमाणात आहेत. त्यामध्ये कागद, बांबू व कापडापासून बनविलेल्या आकाश कंदिलांना अधिक मागणी आहे. शिवाय विद्युत रोषणाई देखील स्वदेशी बनावटीची मागितली जाते. प्लास्टिक व अविघटनशील दिव्यांपेक्षा स्थानिकांनी बनविलेल्या मातीच्या दिव्यांना अधिक पसंती आहे. यामुळे आपोआप पर्यावरण संवर्धन घडत आहे. आणि त्याबरोबरच कोरोनामुळे आर्थिक नुकसान झालेल्या स्थानिक विक्रेते व व्यावसायिकांचा व्यवसाय चांगला होत आहे. लोक स्थानिक विक्रेत्यांकडून आवर्जून वस्तू खरेदी करत आहे. परिणामी कोरोनामुळे विस्कटलेली आर्थिक घडी पुन्हा चांगल्या प्रकारे बसलेली दिसत आहे. कोरोनामुळे कंबर मोडलेल्या स्थानिक व्यापारी व व्यावसायिकांना दिलासा मिळतांना दिसत आहे.

शिवऋण प्रतिष्ठान महाराष्ट्राचे उपाध्यक्ष केतन म्हसके (सुधागड) यांनी सांगितले की गाव-खेड्यातील मुलांना पर्यावरणाचे महत्त्व कळावे, सोबत शिवरायांचे विचार आणि गडकिल्ल्यांची माहिती व्हावी यासाठी किल्ले बनविण्यास मुलांना प्रोत्साहित करत आहोत. त्याद्वारे त्यांना बक्षिसे दिली जातील. यातून पर्यावरणपूरक दिवाळी देखील साजरी होईल. तसेच महाड येथील शिक्षक त्रियुग खेडेकर यांनी सांगितले की, काही पालक मुलांना फटाके न आणता नवीन पुस्तके घेऊन देत आहेत. यातून प्रदूषणाला आपोआप आळा बसणार आहे. शाळाशाळांमधून पर्यावरणपूरक आकाशकंदिल, भेटकार्ड, पणत्या बनविण्याचे उपक्रम घेऊन पर्यावरणस्नेही दिवाळी साजरी करण्याचा संदेश दिला गेला आहे. बच्चेकंपनीने देखील किल्ल्यावर ठेवण्यासाठी सैनिक, प्राणी प्लास्टिकचे न घेता मातीच्या मूर्त्यांना अधिक पसंती दिली आहे. त्यामुळे प्लास्टिक मुक्तीकडे वाटचाल सुरू आहे.

Exit mobile version