॥ विद्युत रोषणाईच्या झगमगाटात पणत्यांना मागणी ॥ बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण
| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
यंदाच्या दिवाळीसाठी पारंपरिक दिव्यांसोबतच विविध प्रकारचे आकर्षक दिवे व पणत्यांना ग्राहकांकडून मोठी मागणी आहे. त्यामुळे झगमगणाऱ्या विद्युत रोषणाईच्या युगातही पारंपरिक मातीच्या दिव्यांचे आणि पणत्यांचे महत्व अबाधित असल्याचे दिसत आहे. त्यामुळे बाजारपेठेत चैतन्याचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दिवाळी हा प्रकाशाचा आणि आनंदाचा सण आहे. या सणानिमित्त घरोघरी पारंपरिक दिव्यांची रोषणाई करण्याची प्रथा आहे. गेल्या काही वर्षांपासून बाजारपेठेत चिनी बनावटीच्या विद्युत माळांचा आणि लखलखत्या रोषणाईचा प्रभाव वाढला आहे. तरी देखील शीतल व मंद प्रकाश देणाऱ्या मातीच्या पणत्यांचे आकर्षण कायम आहे. विद्युत रोषणाईमुळे घरांना आधुनिक रूप येत असले तरी, दिव्यांमुळे मिळणारा पारंपरिक आणि धार्मिक आनंद व सात्विकता ही वेगळीच असते, अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत. त्यामुळे, यंदाची दिवाळी दिव्यांच्या पारंपरिक तेजाने अधिक उजळून निघणार यात शंका नाही.
यंदा दिवाळीसाठी बाजारात विविध प्रकारच्या आकर्षक पणत्या दाखल झाल्या आहेत. त्यामध्ये साध्या मातीच्या पणत्यांपासून ते रंगीत, नक्षीदार, मोती आणि टिकल्यांनी सजवलेल्या पणत्यांचा समावेश आहे. तसेच, फुलवाती ठेवण्यासाठी विशेष डिझाइन केलेल्या, हँडल असलेल्या, तसेच पाण्यात तरंगणाऱ्या पणत्यांनाही ग्राहकांकडून विशेष मागणी आहे. यासोबतच, मोर, बदक, कमळ अशा विविध आकारांतील दिवे, तसेच चिनी माती आणि धातूच्या पणत्या देखील उपलब्ध आहेत.
पारंपरिक महत्व
विद्युत रोषणाईमुळे घराला आधुनिक रूप येतं हे खरं आहे; मात्र, दिवाळीच्या दिवशी तुळशी वृंदावन, पडवी, गच्ची आणि अंगणात मातीचे दिवे लावले तर एक वेगळीच शांतता आणि सात्विकता जाणवते. घरात लक्ष्मीचे आगमन पारंपरिक पद्धतीने व्हावे यासाठी पालीतील महिला आवर्जून पणत्या खरेदी करत असतात.
हाताला काम
स्थानिक कारागीर यांनी गेल्या काही महिन्यांपासून पणत्या बनवण्याचे काम सुरू केले होते. त्यांच्या पारंपरिक कलेतून साकारलेल्या पणत्या आजही पर्यावरणपूरक आणि शुभ मानल्या जातात. या पणत्यांच्या खरेदीमुळे स्थानिक कारागिरांना रोजगार मिळतो, या जाणिवेने अनेक ग्राहक आवर्जून या पणत्यांची खरेदी करत आहेत. याबरोबरच अनेक परप्रांतीय व्यावसायिक हातगाडी, तसेच रस्त्याच्या कडेला विविध प्रकारच्या पणत्या व दिवे विक्रीसाठी बसलेले दिसतात.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पणत्यांना चांगली मागणी आहे. लोकांना आता आपल्या मातीच्या आणि पारंपरिक वस्तूंबद्दल प्रेम वाटू लागले आहे. अनेक ग्राहक खास नक्षीकाम केलेल्या पणत्यांची आणि लहान मुलांसाठी आकर्षक आकारातील दिव्यांची मागणी करत आहेत. त्यामुळे आमच्या कलेला व पोटाला आधार मिळत आहे.
नारायण बिरवाडकर, कुंभार, पाली
