गणेश विसर्जन मिरवणुकांवर निर्बंध; आदेश मोडल्यास थेट कारवाई
| अलिबाग | प्रतिनिधी |
गणेश विसर्जन मिरवणुकीतील डीजेच्या दणदणाटावर अखेर प्रशासनाने कायद्याचा हातोडा मारला आहे. राज्यभरात गणेशोत्सवातील डीजेच्या आवाजावरून रणकंदन सुरू असतानाच रायगड जिल्हा प्रशासनानेही कडक भूमिका घेतली आहे. नागरिकांचे आरोग्य, डोळ्यांची सुरक्षा आणि कायदा-सुव्यवस्था लक्षात घेऊन दि. 19 आणि 25 सप्टेंबरच्या विसर्जन मिरवणुकांमध्ये डॉल्बी/डीजे साऊंड सिस्टीम, तीव्र क्षमतेचे लेझर बीम, स्नो स्प्रे आणि केमिकल स्प्रेच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी प्रतिबंधकात्मक अधिसूचना जारी केली आहे. आदेशाचे उल्लंघन केल्यास थेट कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
गणेश विसर्जनाच्या मिरवणुका शांततेत पार पडाव्यात, कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ नये, हा या निर्णयामागील उद्देश आहे. गणेशोत्सवात डॉल्बी आणि डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे नागरिकांना त्रास होण्याबरोबरच आरोग्यावरही परिणाम होण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे मिरवणुकांमध्ये वापरण्यात येणाऱ्या तीव्र क्षमतेच्या लेझर बीममुळे डोळ्यांना इजा होण्याचा धोका आहे. विशेषतः विसर्जन मिरवणुकीच्या बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या डोळ्यांच्या सुरक्षेचाही प्रशासनाने गांभीर्याने विचार केला आहे.
गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजे वाजवायचा की नाही, यावरून राज्यातील विविध भागांत चर्चा आणि वाद सुरू असतानाच रायगड प्रशासनाच्या निर्णयाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. गणेशोत्सवाचा उत्साह कायम ठेवतानाच नागरिकांच्या आरोग्याची किंमत मोजून जल्लोष नको, अशी भूमिका प्रशासनाने घेतली आहे. त्यामुळे पारंपरिक वाद्ये, भजन आणि भक्तिमय वातावरणात विसर्जन मिरवणुका पार पाडण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
आदेश मोडला तर कारवाई
डॉल्बी/डीजे साऊंड सिस्टीम, तीव्र क्षमतेचे लेझर बीम लाईट, स्नो स्प्रे किंवा केमिकल स्प्रेचा वापर करून प्रतिबंधात्मक आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्ती, संस्था, गणेश मंडळ अथवा संचालकांवर भारतीय न्याय संहितेच्या कलम 223 अन्वये दंडनीय कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे.
दोन दिवस महत्त्वाचे
दि. 19 सप्टेंबर रोजी गौरी-गणपती विसर्जन आणि दि. 25 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी या दोन्ही दिवशी होणाऱ्या श्री गणेश विसर्जन मिरवणुकांसाठी डीजे, डॉल्बी, तीव्र लेझर बीम, स्नो स्प्रे आणि केमिकल स्प्रेवरील प्रतिबंध लागू राहणार आहे.
गणेशोत्सव उत्साहात आणि शांततेत पार पडणे आवश्यक आहे. नागरिकांचे आरोग्य तसेच मिरवणुकीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन हा प्रतिबंधात्मक निर्णय घेण्यात आला आहे. सर्व गणेश मंडळांनी प्रशासनाच्या आदेशाचे पालन करून सहकार्य करावे.
किशन जावळे,
जिल्हाधिकारी
