| टोक्यो | वृत्तसंस्था |
‘गोल्डन स्लॅम’चे स्वप्न उराशी बाळगून टोक्योत दाखल झालेल्या सर्बियाच्या अग्रमानांकित नोव्हाक जोकोविचवर पदकाविनाच माघारी परतण्याची नामुष्की ओढवली आहे. टेनिसमधील पुरुष एकेरीच्या तिसर्या स्थानासाठीच्या सामन्यात स्पेनच्या पाब्लो कॅरेनो बुस्टाने जोकोविचला नामोहरम करून कांस्यपदकावर नाव कोरले. सहाव्या मानांकित बुस्टाने जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेल्या जोकोविचला 6-4, 6-7 (6-8), 6-3 असे नमवले. पराभव जवळ दिसू लागल्यावर जोकोविचला राग अनावर झाला. तिसर्या सेटमध्ये त्याने रिकाम्या स्टेडियममध्ये रॅकेट भिरकावली. त्याशिवाय जाळ्यालासुद्धा दोन वेळा रॅकेट आपटली.