परवानगी न घेता, थेट रस्त्यात उभारला मंडप
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
कोणताही कार्यक्रम राबवित असताना त्याची महसूल विभागासह पोलीस प्रशासनाकडून रितसर परवानगी घेणे आवश्यक आहे. सर्वांसाठीच हा नियम समान आहे. जेणेकरुन कार्यक्रमाची सुरक्षितता तसेच वाहतूक कोंडी होऊ नये. याशिवाय कोणताही अनुचित प्रकार घडू नये. परंतु, शिंदे गटाचे आमदार दळवी यांनी कायदेशीर मार्ग न निवडता रस्त्याच्या भूमीपूजनाच्या वेळी बेलकडे फाटा येथे रस्त्यात मंडप उभारुन भुमीपूजनाचा कार्यक्रम घेतला. कार्यक्रमासाठी उभारण्यात आलेल्या मंडपाची कोणतीही परवानगी आ. दळवी यांच्या कार्यकर्त्यानी घेतली नसल्याची माहिती समोर येत आहे. आमदारच नियम धाब्यावर बसवून परवानगी न घेता कार्यक्रम करीत असतील, तर कायदा फक्त सर्वसामान्यांसाठीच आहे का, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. त्यामुळे आता महसूल विभाग तसेच पोलीस प्रशासन यावर काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
अलिबाग – रोहा मार्गावरील 84 किलो मीटरच्या रस्त्याचे काम अपूर्ण अवस्थेत आहे. सुडकोलीपासून नवघर, वढाव, सहाण पाल्हे, नवेदर बेली येथील पुलांची अवस्था बिकट झाली आहे. त्यामुळे यामार्गावरील अवजड वाहनांना प्रवेशबंद केला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या मार्गावरील प्रवाशांची वणवण होत आहे. रामराजमार्गे रोहा एसटी बंद असल्याने या मार्गावरील प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. या पुलांच्या नुतनीकरणाबरोबरच दुरुस्तीकडे दुर्लक्ष करून विद्यमान आमदार भूमीपूजनावर भर देत आहेत. प्रत्यक्षात मात्र असलेल्या समस्यांकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष होत असल्याची प्रतिक्रीया उमटत आहे.
महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ अंतर्गत अलिबाग बायपास रोड ते अलिबाग रोहा जंक्शनपासून बेलकडे ते गुरूडपाडा, नागाव हटाळे ते रेवदंडा पुल, साळावपासून तळेखारपर्यंतच्या रस्त्याचे भूमीपूजन शुक्रवारी करण्यात आले. या रस्त्याच्या लगत अनेक गावे, वाड्या तसेच घरे, शेतजमीन येतात. त्यांचा विचार न करता, स्थानिकांना विश्वासात न घेता भूमीपूजन करण्यात आले. त्यामुळे एकाच रस्त्याचे आमदार कितीवेळा भुमीपूजन करणार, असा टोलाही नागरिकांनी यावेळी लगावला.
अलिबाग-रोहा मार्गावरील रस्त्याचे भूमीपूजन यापूर्वी चार वेळा करण्यात आले. तत्कालीन भाजपचे नेते तथा शिंदे गटातील विद्यमान कार्यकर्ते दिलीप भोईर आणि दळवी यांच्यात रस्त्याच्या कामावरून श्रेयवादही झाला होता. परंतु, आजही रस्ता खड्डेमय असून, नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. धुळीच्या त्रासाने प्रवासी वैतागले आहेत. दरम्यान, मंडप उभारणाऱ्यांकडून कोणतीही आवश्यक परवानगी घेतली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला असून प्रशासनाच्या निष्क्रीय भूमिकेबद्दलही नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकरणी अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घेऊन कारवाई करण्याची मागणी होत आहे.
