आक्षेपार्ह स्टेटस केल्यास कारवाई

श्रीवर्धन पोलिसांकडून नागरिकांना इशारा

| श्रीवर्धन | वार्ताहर |

श्रीवर्धन पोलिसांनी श्रीवर्धन पोलीस ठाणे हद्दीतील सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणीही कोणत्याही धर्म, जात, पंथ याबाबत कोणत्याही प्रकारची आक्षेपार्ह पोस्ट, फोटो, स्टिकर, मजकूर, व्हिडिओ स्टेटसवर ठेवू नये तसेच सोशल मीडियावर कोणत्याही प्रकारच्या आक्षेपार्ह पोस्ट शेअर करू नयेत. श्रीवर्धन पोलीस ठाणे तसेच रायगड जिल्हा सायबर सेल अशा प्रकारच्या सर्व पोस्टवर लक्ष ठेवून आहेत. अशा प्रकारच्या पोस्ट व्हायरल करणार्‍या व्यक्तींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसेच कोणत्याही प्रकारच्या अफवा किंवा चुकीच्या गोष्टी निदर्शनास आल्यास तात्काळ श्रीवर्धन पोलीस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन श्रीवर्धनचे पोलीस निरीक्षक यू.बी. रिकामे यांनी नागरिकांना केले आहे.

22 जानेवारी रोजी आयोध्या येथे राम मंदिरामध्ये प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यावेळी संपूर्ण देशामध्ये जोरदार जल्लोष साजरा करण्यात आला. परंतु, त्यानंतर सोशल मीडियावर टाकण्यात येणार्‍या पोस्ट व ठेवण्यात येणारे स्टेटस यामुळे काही ठिकाणी दोन गटांमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली. तरी अशाप्रकारे व्हायरल पोस्ट करून कोणीही या ठिकाणचे वातावरण खराब करू नये यासाठी श्रीवर्धन पोलिसांनी खबरदारी घेतली आहे, असेही श्री. रिकामे यांनी सांगितले.

Exit mobile version