‘सूर्यनमस्कार घाला, तंदुरुस्त राहा’

जिल्हा क्रीडा संकुलात जागतिक सूर्यनमस्कार दिन साजरा

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

धावपळीच्या आयुष्याला जणू वेगाची चाकं लागल्याने आरोग्याच्या अनेकविध समस्यांनी विळखा घातला आहे. त्यात फिट राहण्यासाठी वेगवेगळे फंडे वापरले जातात. तळपायासून ते मस्तकापर्यंत तंत्रशुद्ध व्यायमाचे फायदे मात्र सूर्यनमस्कारापासूनच मिळतात. आपल्या एकूणच जीवन पद्धतीत सूर्यनमस्कार व्यायामाला मोठे महत्त्व आहे. दरदिवशी सूर्यनमस्कार घातल्याने शरीर आणि मनाची एकाग्रता साधली जाते, असे प्रतिपादन जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांनी केले.

रथसप्तमी आणि जागतिक सूर्यनमस्कार दिनानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी रायगड, नेहरु युवा केंद्र अलिबाग, प्रिझम अकॅडमी अलिबाग आणि पीएनपी महाविद्यालय अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने सामूहिक सूर्यनमस्कार घालण्यात आले.

याप्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, नेहरू युवा केंद्र समन्वयक निशांत रौतेला, राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेत्या तपस्वी गोंधळी, पीएनपी महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक तेजेस म्हात्रे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रायगडचे सचिन निकम, सिद्धार्थ, सुरेंद्र तसेच विद्यार्थी आणि खेळाडू उपस्थित होते.

दरम्यान, रवींद्र नाईक यांनी सूर्यनमस्कारचे महत्त्व विशद केले, तसेच निशांत रौतेला आणि तपस्वी गोंधळी यांनीदेखील सूर्यनमस्कारचे फायदे सांगितले.

मुरुडमध्ये सूर्यनमस्कार दिन

| मुरूड जंजिरा | वार्ताहर |

माघ शुद्ध सप्तमी म्हणजेच रथ सप्तमी हा दिवस जागतिक सूर्यनमस्कार दिन म्हणून साजरा केला जातो. मुरुडच्या महिला मंडळातर्फे हिंदू बोर्डींगच्या पटांगणावर महिलांनी हा दिन साजरा केला.


सूर्यनमस्कार म्हणजे सूर्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची संधीच होय. सूर्यनारायणाची मनोभावे पूजा करण्याचा व त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या या दिवशी मुरुडमधील महिलांनी शनिवारी सकाळी सहा वाजता एकत्र जमून सूर्यनमस्कार घालून आपला भाव व्यक्त करतानाच जागतिक सूर्यनमस्कार दिनही साजरा केला.

Exit mobile version