। मुंबई । वृत्तसंस्था ।
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कामगारांनी आपल्या न्याय मागण्यांसाठी पुकारलेल्या आंदोलनाला ज्येष्ठ कामगार नेते व ऑल इंडिया पोर्ट अँड डॉक वर्कर्स फेडरेशनचे अध्यक्ष अॅड. एस. के. शेट्ये आणि सरचिटणीस व मुंबई पोर्ट ट्रस्टचे विश्वस्त सुधाकर अपराज यांनी जाहीर पाठिंबा दर्शविला आहे.
एसटी कामगारांना शासनाच्या इतर विभागातील कामगारांच्या तुलनेत कमी पगार देऊन महामंडळ कामगारांवर अन्याय करीत आहे. त्यामुळे एसटी कामगारांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढत चालले आहे. एसटी कामगार जनतेची अवितरत सेवा करीत आहेत, त्यामुळे त्यांचे राज्यशासनात विलीनीकरण करावे, त्यांना राज्यशासकीय कर्मचार्यांना मिळणार्या सर्व सुख सुविधा मिळाल्या पाहिजेत, एसटी कामगारांची ही मागणी न्याय व रास्त आहे. राज्य परिवहन महामंडळ हे राज्य शासनात विलीन करून वेतन, भत्ते व इतर सवलती राज्य शासनाच्या नियमाप्रमाणे त्यांना देण्यात याव्यात.
एसटी कामगारांच्या संपात आतापर्यंत दोन हजार कर्मचार्यांना निलंबित केले आहे. कामगारांची 28 टक्के महागाई भत्ता, घरभाडे भत्ता या मागण्या मान्य केल्या असून, राज्य परिवहन मंडळाचे महाराष्ट्र शासनात विलीनीकरण झाले पाहिजे, ही महत्त्वाची मागणी एसटी कामगारांची आहे. एसटी कामगारांच्या संपामुळे सर्वसामान्य जनतेची ऐन दिवाळीत गैरसोय झाली, हे खरे असले तरी एसटी कामगारांना मात्र संपाशिवाय दुसरा पर्याय नव्हता. एसटी कामगारांच्या या न्याय लढ्याला बंदर व गोदी कामगारांचा जाहिर पाठिंबा आहे.