भयंकर! रायगडमध्ये पसरतेय विचित्र प्रकारची साथ

कोविडच्या भीतीने गाळण;घशांच्या त्रासाचे रुग्ण वाढले
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यात सर्वच तालुक्यामध्ये सध्या घसाच नव्हे, तर छाती फोडणार्‍या विचित्र प्रकारच्या खोकल्याची साथ पसरली आहे. घसादुखीने सुरुवात होते आणि हळूहळू सर्व शरीराला त्याचा त्रास होतो असा हा खोकला आहे. घसा बसतो, आवाज बदलतो आणि रात्रीची झोप उडवणारा हा खोकला औषधे घेतल्यानंतरही किमान तीन आठवडे साथ सोडत नाही. सरकारी आणि खासगी दवाखान्यांमध्ये अशा रुग्णांच्या रांगा लागत आहेत.

वर्षाच्या अखेरीस सर्वत्र थंडीचा कडाका होता. तेव्हापासून हा खोकला चिकटला आहे. घशात असह्य वेदना सुरू होतात आणि नंतर असा काही खोकला येतो की, खोकल्यानंतर छाती फुटतेय की काय असा त्रास होतो. त्यानंतर सर्दी जाणवू लागते आणि नाक चोंदायला सुरुवात होते. रात्री झोपल्यानंतर आणि सकाळी उठल्यानंतर या खोकल्याची तीव्रता अधिक जाणवत आहे. दरम्यान, हा कोरोनाचा नवा व्हेरिंएंट तर नाही ना, अशी चिंता व्यक्त करत वैद्यकीय तज्ञांनी सावध केले आहे.

जिल्हा सामान्य रुग्णालय, सरकारी रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच खासगी डॉक्टरांच्या दवाखान्यांमध्ये उपचारासाठी येणार्‍या रुग्णांमध्ये खोकल्याच्या रुग्णांची संख्या मोठी असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सध्या तरी कुणाला दाखल करण्याची आवश्यकता भासलेली नाही; परंतु असा आजार झाल्यास हलगर्जी न करता तातडीने उपचार घ्यावेत, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.

कोव्हिड-19 गेला, पण त्यानंतर कोव्हिडचे नव-नवे व्हेरिएंट समोर येत आहेत. घसादुखीची लक्षणे ही कोविडप्रमाणेच समान आहेत; पण अनेक रुग्णांची कोव्हिड चाचणी निगेटिव्ह येत आहे. कदाचित अद्यापपर्यंत न सापडलेला हा कोव्हिडचा नवा व्हेरिएंट तर नाही ना, अशी तज्ञांना शंका आहे. प्रत्येक व्हेरिएंटसाठी वेगळे चाचणी कीट असते. आतापर्यंतच्या व्हेरिएंटच्या चाचण्या त्या किटद्वारेच केल्या गेल्या. नवा व्हेरिएंट असेल तर तशी चाचणी किट्स वापरल्याशिवाय निदान होणारच नाही, असे तज्ञांचे म्हणणे आहे.

खोकला आणि घसा दुखणार्‍या रुग्णांची संख्या वाढली आहे. खोकल्याची तीव्रता आणि त्यामुळे जाणवत असलेल्या इतर त्रासांची तपासणी करून तसेच आवश्यकता वाटल्यास अन्य वैद्यकीय चाचण्या करून रुग्णांवर उपचार केले जात आहेत. रुग्णांना दाखल करून घेण्याची गरज सध्या तरी भासलेली नाही.

डॉ. सुहास माने, जिल्हा शल्य चिकित्सक

Exit mobile version