भाजपात प्रवेश, तरीही टळली नाही इडीची पिडा
| पनवेल | प्रतिनिधी |
गेल्याच महिन्यात भाजपमध्ये प्रवेश केलेल्या पनवेलच्या जे एम म्हात्रे यांच्या कंपनीवर ईडीने छापेमारी केली आहे. वनविभागाची जमीन बनावट कागदपत्रांच्या आधारे हडप करून ती नॅशनल हायवे ऑथोरिटीला विकल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. यामध्ये जे.एम.म्हात्रे यांनी शासनाची 42.4 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी जे. एम. म्हात्रे इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेडच्या पनवेलमधील कार्यालयावर छापा टाकून दस्तावेज जप्त केले आहेत. हा गैरव्यवहार 2005 साली बनावट कागदपत्रांच्या आधारे वनविभागाच्या जमिनीचा ताबा घेतल्याच्या आरोपांशी संबंधित आहे. उरण वनविभागाने याप्रकरणी 2023 मध्ये तक्रार दाखल केली होती, ज्यावर कारवाई करत ईडीने ही धाड टाकली आहे.
वहाळ गावात वन विभागाची जमीन प्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्याचा ससेमीरा पाठीशी लागू नये यासाठीच जे.एम. म्हात्रे हे आपले पुत्र प्रीतम पाटील आणि सहकारी यांच्यासह भारतीय जनता पक्षात प्रवेश केले असल्याची टीका आता विरोधकांकडून होऊ लागली आहे. भाजपने त्यांना लाचुच दाखवत पक्ष प्रवेश करून घेतला असल्याचेही बोलले जात आहे.
सध्या ईडीकडून जमिनीचे मूळ दस्तऐवज, आर्थिक व्यवहाराची कागदपत्रे, बँक खात्यांची माहिती, तसेच तात्कालिक व्यवहारांमागील संगणकीय डेटा जप्त केला जात आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, या कारवाईतून राजकीय आणि प्रशासकीय साठेबाजांशी असलेले संबंध उघड होण्याची शक्यता आहे. हा व्यवहार पनवेल तालुक्यातील मौजे वहाळ गावात करण्यात आला होता. जे. एम. म्हात्रे यांनी या प्रकरणातील 1.86 हेक्टर जमीन ला विकून 42.4 कोटी रुपये मिळवल्याचा आरोप आहे. तसेच, सहआरोपी सय्यद कादरी यांनी त्याच भूखंडातील 0.44 हेक्टर जमीन विकून 9.69 कोटी रुपयांचा व्यवहार केल्याचे समोर आले आहे.
अन्य कामांचीही होणार चौकशी?
जे.एम.म्हात्रे यांनी रॉयल्टी बुडवून अनेक ठिकाणी भराव केल्याचे बोलले जात आहे. याशिवाय खोट्या रॉयल्टीच्या पावत्या दाखवून शासनाची फसवणूक केल्याचीही चर्चा सुरु आहे. त्यामुळे ईडीकडून याप्रकरणाचीही चौकशी होणार का?, तसेच अनेक अवैद्य कामे समोर येणार का?, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले असून आता म्हात्रे यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे समोर येत आहे.





