तळा शहरात कुत्र्यांची दहशत

| तळा | वार्ताहर |

तळा शहरात गेल्या काही दिवसांपासून भटक्या कुत्र्यांची मोठी दहशत निर्माण झालेली आहे. शहरात तसेच वसाहतीमध्ये ठीक ठिकाणी भटक्या कुत्र्यांचा कळप फिरत असल्याने त्याचा त्रास येथील रहिवाशांना होत आहे. रात्रीच्या वेळेस दुचाकीवरुन जाणार्या वाहनचालकाच्या अंगावर भटकी कुत्रे भुंकत जात असल्याने अपघाताला निमंत्रण येत आहे. या भटक्या कुत्र्यांवर तळा नगरपंचायतीने त्वरित कारवाई करून कायमचा बंदोबस्त करण्याची मागणी तळावासीयांकडून करण्यात येत आहे.

शहरात नवनवीन वस्ती वाढत चालली आहे. त्यामध्ये समर्थनगर,अंबिकानगर, साईनगर यांसारख्या ठिकाणी देखील भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडलेला आहे. अनेक भटके कुत्रे या वसाहतींमध्ये विविध ठिकाणी फिरत असून, त्याचा त्रास रहिवाशांना होत आहे. लहान मुले आबालवृद्ध, वाहनचालक, दुचाकीस्वार यांच्या अंगावर धावून जखमी करण्याचे प्रकारही काही वेळा घडले आहेत. मात्र, याकडे तळा नगरपंचायत प्रशासन पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहे. तरी भटक्या कुत्र्यांचा कायमचा बंदोबस्त करावा, अशी मागणी रहिवासी करीत आहेत.

Exit mobile version