| रेवदंडा | प्रतिनिधी |
रेवदंडा समुद्रकिनारी टोळीने फिरणाऱ्या उनाड कुत्र्यांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे समुद्रकिनारी येणाऱ्या पर्यटकांसह स्थानिकामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल आहे. त्यामुळे या उनाड कुत्र्यांचा बदोबस्त करावा, अशी मागणी केली जात आहे.
रेवदंडा समुद्रकिनारी स्थानिकांसह पर्यटक मोठ्या संख्येने भेट देत असतात. मात्र, या ठिकाणी उनाड कुत्र्यांची मोठी टोळी ठिकठिकाणी उभी असलेली दिसते. त्यामुळे येथे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. सकाळच्या सुमारास मॉर्निंग वॉकच्या निमित्ताने समुद्रावर फेरफटका मारताना ही उनाड कुत्री अंगावर भुंकतात. त्यामुळे हातात काठी घेऊनच जावे लागत असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहेत. त्यामुळे समुद्रकिनारी फिरणे, धावणे, चालणे यासाठी मोकळेपणा प्राप्त होत नाही. सुदैवाने अद्यापी उनाड कुत्र्यांनी कोणालाही चावा घेतल्याची बातमी समोर आलेली नाही. परंतु, भविष्यात अशी दुर्दैवी घटना घडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान, या उनाड कुत्र्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करण्याची मागणी स्थानिकांकडून जोर धरत आहे.