नवीन पनवेलमध्ये घरगुती गॅसचा तुटवडा

सिलिंडरसाठी पहाटेपासून लांबच लांब रांगा

| नवीन पनवेल | प्रतिनिधी |

नवीन पनवेल परिसरात घरगुती गॅस सिलिंडरच्या टंचाईमुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असून, गॅस मिळवण्यासाठी ग्राहकांना पहाटेपासूनच रांगा लावाव्या लागत आहेत. जागतिक पातळीवर सुरू असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीचा परिणाम आता स्थानिक बाजारपेठेतही जाणवू लागल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

नवीन पनवेल येथील गॅस वितरक कार्यालयाबाहेर पहाटेपासूनच ग्राहकांची मोठी गर्दी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. अनेक नागरिक आपले रिकामे गॅस सिलिंडर घेऊन कार्यालयाबाहेर रांगेत उभे राहून सिलिंडर कधी मिळणार याची वाट पाहात होते. काही ठिकाणी तर रांगा इतक्या लांब वाढल्या की रस्त्याच्या कडेला सिलिंडरची ओळच लागल्याचे दृश्य दिसून आले.

सिलिंडर मिळवण्यासाठी महिलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत अनेक जण तासन्‌‍तास उन्हात उभे असल्याचे दिसून आले. वाढत्या मागणीमुळे आणि अपुऱ्या पुरवठ्यामुळे नागरिकांची गैरसोय होत असून गॅस मिळेल की नाही याबाबतही अनिश्चितता निर्माण झाली आहे. दरम्यान, घटनास्थळी परिस्थितीचे छायाचित्रण करण्यासाठी गेलेल्या माध्यम प्रतिनिधींना काही ग्राहक तसेच काही कर्मचाऱ्यांकडून अडविण्याचा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. फोटो काढू नका असे सांगत माध्यमांना रोखण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने याबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.

गॅस वितरणाबाबत स्पष्ट माहिती उपलब्ध नसल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून, अनेकांनी प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन गॅस पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी केली आहे. दरम्यान, वाढती मागणी आणि पुरवठ्यातील अडचणी यामुळे गॅस वितरणावर ताण निर्माण झाल्याचे संबंधितांकडून सांगण्यात येत असून, परिस्थिती लवकरच सुरळीत करण्याचे आश्वासनही देण्यात येत आहे.

Exit mobile version