सत्कार्याला माणुसकीची गरज आहे: डॉ. कल्याणी

| आगरदांडा | प्रतिनिधी |

मानवी रक्ताला कोणताही पर्याय नाही आणि ते कृत्रिमरित्या तयार होत नाही. रक्त अधिक काळ साठवून ठेवता येत नाही. आताच्या काळात आजारपण, अपघात यांचे प्रमाण वाढले आहे. वाढत्या मागणीमुळे सर्वच रक्तपेढ्यांमध्ये रक्त मुबलक असणे गरजेचे आहे. रुग्ण सेवेवर परिणाम होऊ नये म्हणून काळाची गरज ओळखून आपण स्वेच्छेने नियमित रक्तदान करावे, असे आवाहन डॉ. मयूर कल्याणी यांनी अलिबाग-मुरुड मेडिकल असोसिएशन, जंजिरा मेडिकल असोसिएशन व जय श्रीराम नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित यांच्या संयुक्त विद्यमाने ब्लड बँक, सिव्हिल हॉस्पिटल अलिबाग यांच्या सौजन्याने मुरुड कल्याणी हॉस्पिटलच्या प्रांगणात आयोजित केलेल्या रक्तदान शिबीर कार्यक्रमावेळी केले.

यावेळी प्रथम धन्वंतरी मूर्तीला पुष्पहार, दीपप्रज्वलन करुन तसेच श्रीफळ वाढवून रक्तदान शिबिराला सुरूवात करण्यात आली. यावेळी जंजिरा मेडिकल असो. अध्यक्ष डॉ. संजय पाटील, अलिबाग-मुरुड मेडिकल असोशिएशनच्या अध्यक्षा डॉ. सुनिता पाटील, माजी अध्यक्ष डॉ. मयूर कल्याणी, रायगड जिल्हा मेडिकल असोसिएशन अध्यक्ष डॉ. निशिगंध आठवले, भारतीय तटरक्षक दलाचे कमांडर राजेश दौलखंडी, डॉ. राज कल्याणी, मुरुड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर, डॉ. अमित बेनकर, जिल्हा रक्तपेढीचे प्रमुख डॉ. दीपक गोसावी, डॉ. परदेशी, डॉ. पेशईमाम, डॉ. इप्सित पाटील, डॉ. भाविका कल्याणी, डॉ. मंगेश पाटील, डॉ. हितेश जैन, पॅथॉलॉजिस्ट सुनील पटेल, जय श्रीराम नागरी पतसंस्थेचे व्हा. चेअरमन प्रा. मेघराज जाधव, कोषाध्यक्ष बाळकृष्ण कासार, सचिव सुनील विरकुड, सरव्यवस्थापक संजय ठाकूर, उमेश भायदे आदी मान्यवर उपस्थित होते.

या शिबिरात 147 रक्तदात्यांनी उस्फूर्त प्रतिसाद नोंदवत मुरुडमध्ये उच्चांक गाठला आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे महिलांचादेखील यामध्ये सहभाग होता. तटरक्षक दल, नूतन नर्सिंग स्कूल नांदगाव, मुरुड शहर व राजपुरी कोळी वाड्यातील युवकांचा उत्स्फूर्त सहभाग होता. रक्तदात्यांना प्रशस्तीपत्र व फळे देण्यात आली. शिबीर यशस्वी करण्यासाठी सुनील बंदी छोडे, वैभव कांबळे, श्रीराम पतसंस्थेच्या सर्व कर्मचारीवृंदानी विशेष परिश्रम घेतले.

Exit mobile version