खोटी स्वप्ने दाखवून शेतकऱ्यांची फसवणूक करु नका

बल्क ड्रग्ज पार्कच्या बैठकीत शेतकऱ्यांनी स्थानिक आमदारांना सुनावले

| रायगड | खास प्रतिनिधी |

रोहा आणि मुरुड तालुक्यातील प्रस्तावित असणाऱ्या बल्क ड्रग्ज फार्मा पार्क प्रकल्पावरुन शेतकऱ्यांनी आज स्थानिक आमदारांना चांगलेच धारेवर धरले. ज्या कंपनीला अद्याप मंजूरी मिळालेली नाही. तो प्रकल्प भांडवलदारांच्या फायद्यासाठी शेतकऱ्यांच्या माथी मारु नका, कागदावरील विकासाची स्वप्ने दाखवून शेतकऱ्यांची फसवणूक करु नका, अशा शब्दात शेकडो शेतकऱ्यांनी स्थानिक आमदारांना सुनावले. त्यामुळे आमदारांची अवस्था बघण्यासारखी झाली होती.

बल्क ड्रग्ज फार्मा पार्क प्रकल्पाबाबत जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी रोहा आणि मुरुड तालुक्यातील शेतकऱ्यांची बैठक आज अलिबाग येथील नियोजन भवन येथे बोलवली होती. या बैठकीला स्थानिक आमदारांसह एमआयडीसीचे अधिकारी पी.डी. मलीकनेर उपस्थित होते. सुरुवातीला बल्क ड्रग्ज फार्म पार्क बाबत सादरीकरण करण्यात आले. प्रकल्प शेतकऱ्यांच्या कसा हिताचा आहे, तसेच त्यामुळे शेतकऱ्यांचा कसा उत्कर्ष होणार आहे. हे पटवून देण्याचे काम एमआयडीसीचे अधिकारी करत होते. तसेच स्थानिक आमदार शेतकऱ्यांची बाजू घेण्या एैवजी कंपनीच्या बाजूने बोलत होते. आमदारांच्या या भूमिकेमुळे उपस्थित शेतकरी कमालीचे नाराज झाले. आमदार कंपनीचे आहेत की शेतकऱ्यांचे असा प्रश्न त्यांना पडला.


भूसंपादन कायदा 2013 देशात लागू केलेला असताना एमआयडीसी कायद्याने जमिनीचे संपादन का करण्यात येत आहे, असा सवाल सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांनी उपस्थित केला. 2013 च्या कायद्यामध्ये शेतकऱ्यांचे हित जपण्यात आले आहे, त्यामुळे एमआयडीसी ॲक्ट नुसार संपादन केल्यास त्याचा सर्वाधिक फायदा कंपनीचा होणार आहे. त्यातून बक्कळ आर्थिक नफा कंपनी कमावणार आहे, याकडेही महाजन यांनी लक्ष वेधले. सरकार प्रशासनाने विकासाची खोटी स्वप्न भाबड्या शेतकऱ्यांना विकू नका असे महाजन यांनी सांगितले. शेतकरी जमीन संपादनाला आणि फार्मा पार्कला विरोध करत असल्याचे दिसून येताच स्थानिक आमदार शेतकऱ्यांवरच चिडल्याचे दिसून आले. शेतकऱ्यांच्या बाजूने बोलण्या एैवजी एमआयडीसी आणि फार्मा कंपनी तळी आमदार उचलत आहेत. त्याना शेतकऱ्यांची चिंता नाही, त्यांना भांडवलदाराचे हित जपायचे आहे, असे रंजना पाटील यांनी महिलेने कृषीवलशी बोलताना सांगितले. सरकारने अद्याप बल्क ड्रग्ज पार्कला मंजूरी दिलेली नाही. तो प्रकल्प अद्याप कागदावरच आहे. तो प्रकल्प शेतकऱ्यांच्या माथी मारण्यात कोणाचे हित जपले जात आहे, असा सवाल अतुल पाटील या शेतकऱ्यांने उपस्थित करत आमदारासह जिल्हा प्रशासन, एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांच्या ढोंगीपणाचा बुरखा फाडल्याचे पहायला मिळाले.

रेोहा-मुरुड संघर्ष समितीने न्हावे, नवखार, सोनखान मधील शेतकऱ्यांनी प्रकल्पाला विरोध दर्शवला होता. त्याची उत्तरे अद्याप संर्घष समितीला भेटली नाहीत. स्थानिक ग्रामस्थ, शेतकरी यांच्याबरोबर चर्चा आणि विचार होत नाही तोपर्यंत आमचा विरोध राहील. प्रकल्पाच्या बदल्यामध्ये नोकरी, साडे बावीस टक्के जमिन असे आमिष स्थानिक आमदारांनी शेतकऱ्यांना दाखवले होते आता मात्र त्यांचा सूर बदलला आहे. आता ते म्हणतात 10 टक्के जमिन देऊ. त्यामुळे आमचा त्यांच्यावर अजिबात विश्वास नाही, असे संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रमोद कासकर यांनी सांगितले.

आमचा प्रकल्पाला विरोध नाही मात्र एमआयडीसीमार्फत संपादन करण्यात येऊ नये, शेतकऱ्यांची कुळवहिवाट, सरकार/सावकारी जमिनी वरील प्रलंबीत प्रकरणे मार्गी लावावीत, प्रकल्प आणताना प्रशिक्षण केंद्र उभारण्यात यावे या सह अन्य मागण्या मान्य न झाल्यास शेतकऱ्यांचा बल्क ड्रग्ज फार्मा प्रकल्पाला विरोध राहील अशी भूमिका भाजपा नेते ॲड. महेश मोहिते यांनी मांडली.

जिल्हाधिकारी यांनी बल्क ड्रग्ज फार्मा पार्क बाबत बैठक बोलवली होती. या बैठकीला रोहा-मुरुड तालुक्यातील शेतकरी, कष्टकरी, मच्छिमार मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामुळे जिल्हधिकारी कार्यालयाच्या परिसरामध्ये मोठ्या संख्येने गर्दी झाली होती. आपल्या जमिनी कंपनीच्या घशात घालायच्या नाहीत. आमदारांच्या बोलण्याला कोणीही भुलायचे नाही. अशा चर्चा परिसरात चांगल्याच रंगल्या होत्या.
जिल्हाधिकारी परिसरामध्ये जमिनीचे व्यवहार करणारे काही दलाल देखील आल्याचे दिसून आले. शेतकऱ्यांची एकजूट बघुन त्यांना देखील चांगलाच घाम फुटला. शेतकरी जमीनी विकण्याच्या स्थितीमध्ये नाहीत, असे चित्र त्यांना दिसल्याने संबंधितांनी काही ठिकाणी मोबाईलवर संपर्क साधून याची माहिती दिली. काही शेतकऱ्यांना त्यांच्या हालचाली संशयास्पद दिसल्याने त्यांनी हटकल्यानंतर दलालांनी तेथून पळ काढल्याची चर्चा होती.
आरसीएफ कंपनीची जनसुनावणी काही महिन्यापूर्वी पार पडली होती. त्या सुनावणीला देखील स्थानिक आमदारांनी हस्तक्षेप केला होता. आरसीएफ कंपनीच्या नवीन प्रकल्पाबाबत नागरिकांचे काही प्रश्न होते. ते त्यांना सुनावणीमध्ये मांडायचे होते. परंतू स्वतःच माईक हातात घेत सुनावणी रद्द झाल्याचे आमदारांनी जाहिर केले होते. आमदाराच्या या कृतीने नागरिक प्रचंड प्रमाणात चिडले होते. आजच्या बल्क ड्रग्ज पार्कच्या बैठकीत देखील त्यांची लुडबुड दिसल्यानेे नागरिक कमालीचे संतप्त झाल्याचे दिसून आले.
Exit mobile version