| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
टी-20 विश्वचषकातील दोन्ही सामन्यांत टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये ऋषभ पंतची अनुपस्थिती खूपच चर्चेत राहिली आहे. पाकिस्तान आणि नेदरलँड्सविरुद्ध भारताने पंतऐवजी दिनेश कार्तिकला यष्टिरक्षक फलंदाज म्हणून खेळवले. भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांच्या मते, कार्तिकच्या खराब विकेटकीपिंगमुळे पंतला संधी देण्याची गरज आहे, असे मत त्यांनी मांडले.
कार्तिकने आयपीएल 2022 मध्ये आरसीबीसाठी यष्टीरक्षकाची भूमिका बजावली होती. जेव्हा 37 वर्षीय अनुभवी यष्टीरक्षकाने भारतीय संघासाठी पुनरागमन केले तेव्हापासून, त्याने भारतासाठी काही संस्मरणीय खेळी खेळल्या आहेत, त्यामुळे त्याची सर्वोत्तम ‘फिनिशर’ म्हणून ओळख निर्माण झाली.
कार्तिक पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात दबावाला बळी पडला आणि नेदरलँड्सविरुद्ध खेळतानादेखील त्याने त्याच चुका पुन्हा केल्या, त्यामुळेच कपिल देव यांना दिनेश कार्तिकच्या जागी ॠषभ पंत हवा आहे. तसेच मधल्या फळीत डावखुरा फलंदाज असल्यास भारताला कसा फायदा होऊ शकतो याकडेही त्यांनी लक्ष वेधले.