नाणार प्रकल्पात खोडा घालू नका

उद्योगमंत्र्यांचा शिवसेनेला टोला
। मुंबई । प्रतिनिधी ।

फॉक्सकॉन वेदांता प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याबद्दल कंठशोष करताना महाविकास आघाडी सरकारच्या काळात गुजरातपेक्षा चांगले पॅकेज देण्यात कमी का पडलो, याचे उत्तर आदित्य ठाकरे, जयंत पाटील यांनी आधी द्यावे, आता त्यापेक्षा दुपटीहून अधिक गुंतवणूक असलेल्या नाणार रिफायनरीच्या गुंतवणुकीत खोडा घालू नका, असा टोला उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शिवसेनेला लगावला आहे.

काहीच दिवसांपूर्वी राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शिवसेना-भाजप युतीचे सरकार आले. तेव्हा फॉक्सकॉन वेदांताने आम्हाला सांगितले की, गुजरातने अधिक चांगले पॅकेज दिल्याने आम्ही तेथे गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही लगेच त्यांच्याशी संपर्क साधला आणि अधिक चांगले पॅकेज देऊ केले. त्यांनी आमच्याशी चर्चाही केली. भरपूर प्रयत्न करूनही त्यांनी आधीच्या गुजरातच्या निर्णयावर ठाम राहण्याचे ठरविले. आता दोषारोपच करायचा असेल तर मग मविआच्या काळात फॉक्सकॉनला चांगले पॅकेज का देण्यात आले नाही? दोन वर्षांपासून ते गुजरातशी वाटाघाटी करीत असताना आधीच्या सरकारने त्यांचे मन का वळविले नाही? अडीच वर्षांच्या मविआच्या काळात कोणती मोठी गुंतवणूक आली? याची उत्तरं त्यांना द्यावी लागतील. यापेक्षा कितीतरी अधिक गुंतवणूक 2014 ते 2019 या भाजप-सेना युतीच्या सरकारच्या काळात आली होती.

आदित्य ठाकरे किंवा जयंत पाटलांनी फार काळजी करण्याची गरज नाही. आता वेदांताची 1.56 लाख कोटींची गुंतवणूक गेल्याबद्दल गळे काढताना नाणार रिफायनरीच्या माध्यमातून होणार्‍या 3.5 लाख कोटी रूपयांच्या गुंतवणुकीत तरी खोडा घालू नका, असा टोला उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शिवसेनेला लगावाला आहे.

प्रकल्प गुजरातला गेल्याचे आम्हालाही दु:ख आहे. पण, निराश असलो तरी खचलो नाही. आम्ही सेमिकंटक्टर क्षेत्रातील अन्य कंपन्यांशी चर्चा करू आणि त्यांना महाराष्ट्रात आणू. गेल्या अडीच वर्षांपेक्षा अधिक चांगल्या उंचीवर महाराष्ट्राला निश्‍चितपणे नेऊ.

– उदय सामंत, उद्योगमंत्री
Exit mobile version