जमिनीचे पैसे नको, प्रकल्पात भागीदारी द्या- जयंत पाटील

| रायगड | प्रतिनिधी |

अलिबागची आपली आमदारकी गेली आणि पाच हजार कोटींचे नुकसान झाले आहे. उद्याची मुंबई अलिबागच्या दारात येऊन ठेपली आहे. जमिनीचे पैसे नको, प्रकल्पामध्ये भागीदारी द्यावी, अशी मागणी शेतकरी कामगार पक्ष करणार आहे. जमिनीचे मालक म्हणून शेतकरी जगला पाहिजे. भविष्यात रत्नागिरीपर्यंत मुंबई पोहोचणार आहे. त्याचा आराखडा तयार झाला आहे. या विकासाचा वेध घेऊन जनतेचे प्रश्‍न शासन दरबारी मांडणार्‍या सुशिक्षित उमेदवाराला निवडून द्यावे, असे आवाहन शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी केले.


अलिबाग तालुक्यातील कुरुळ येथील राही गार्डनमध्ये आढावा बैठकीचे रविवारी (दि. 10) रोजी आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी संजय पाटील, अ‍ॅड. मानसी म्हात्रे, उबाठा गटाचे अमीर ठाकूर, प्रफुल्ल पाटील, प्रकाश पाटील, नंदकुमार पाटील, श्रीकांत पाटील, सुरेश पाटील, अशोक घाडगे, अ‍ॅड. प्रसाद पाटील, अवधूत पाटील, ऋषिकेश माळी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

निवडणूक वेगळ्या पद्धतीची आहे, मतदारसंघात महाविकास आघाडीसाठी पोषक वातावरण आहे, विकासकामे मंजूर करण्यासाठी आजपर्यंत अलिबागच्या आमदाराने टक्केवारी घेतली नाही; परंतु महायुतीच्या आमदाराने टक्केवारी घेण्याचा कळस गाठला आहे, विधानसभा सभागृहात अनेक प्रश्‍न मांडले आणि तडीस नेण्याचे काम शेतकरी कामगार पक्षाने केले आहे, असे जयंत पाटील म्हणाले.

भविष्यात कुरुळ ग्रामपंचायत नगरपालिकेत विलीन होईल, विकासाची कवाडे अधिक उघडली जातील, अलिबाग तालुका वीस वर्षांनी मागे गेला आहे, अर्थसंकल्पीय अधिवेशनात विकासासाठी मुद्दे सादर करणे गरजेचे असताना महायुतीच्या आमदाराने विकासाचा दृष्टिकोन ठेवला नाही, यामुळे अपेक्षित विकासकामे होऊ शकली नाहीत. मर्यादा उल्लंघन केल्याने अलिबागचे नाव खराब केले आहे, पैसे घेऊन पक्ष बदलणार्‍या आमदाराला मतदार राजकारणातून हद्दपार करणार यात तिळमात्र शंका नाही, असे जयंत पाटील म्हणाले.

कोरोना काळात शेतकरी कामगार पक्षाने गरजूंना धान्यवाटप केले, तळागाळात शिक्षणाची गंगा पोहोचविण्याचा प्रयत्न केला, विद्यार्थिनींना शाळेत जण्यासाठी आणि शिक्षणाला गती मिळावी यासाठी सायकल वाटप केल्या, मतदारसंघातील जनतेला दृष्टी मिळावी यासाठी चष्मे दिले आहेत, त्यामुळे अलिबागच्या जनतेने दूरदृष्टी ठेवून सुशिक्षित असणार्‍या उमेदवाराच्या पाठीशी उभे राहावे आणि अलिबाग विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास साधावा, असे आवाहन जयंत पाटील यांनी केले.

अलिबाग विधानसभा मतदारसंघातील जनता आमदाराच्या वागणुकीला कंटाळली आहे. शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवाराला महाविकास आघाडीतील घटक पक्ष जिद्दीने उभे राहिले आहेत. मतदारसंघात काँग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट, आम आदमी पार्टी असे विविध पक्ष मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहेत, त्यांच्या या कामगिरीचे फलित निश्‍चित मिळणार असून, महाविकास आघाडीच्या उमेदवार विधानसभेत प्रतिनिधित्व करणार आहेत, असे जयंत पाटील म्हणाले.

अलिबाग-मुरुड-रोहा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे कार्यकर्ते घरोघरी पोहोचले आहेत. मतदारांना सन्मान देण्याचे काम प्रचाराच्या माध्यमातून केले जात आहे. शेतकरी कामगार पक्षाच्या खांद्याला खांदा लावून घटक पक्षाने काम करण्यास चिडीने सुरुवात केली आहे. यामुळेच महाविकास आघाडीचे उमेदवार विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचले आहेत, असे जयंत पाटील म्हणाले.

विकासाच्या नावावर पोकळ गप्पा
शेतकरी कामगार पक्षाने विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. मतदारसंघात महाविकास आघाडीच्या विजयाचे वारे वाहात आहेत. विरोधकांची वेडंवाकडं बोलण्याची हिंमत नाही. कुरुळ ग्रामपंचायत आणि परिसरात विकासाच्या नावाने महायुतीच्या उमेदवाराने केवळ आश्‍वासने दिली आहेत. विकासाच्या नावावर पोकळ गप्पा मारल्या जात आहेत, विकास केवळ कागदावर झाला आहे, अलिबागची शान घालवण्याचे काम विरोधकांनी केले आहे. ही लढाई विचारांची आणि संस्काराची लढाई आहे, यामुळे महाविकास आघाडी आता पेटून उठली आहे, असे अ‍ॅड. मानसी म्हात्रे म्हणाल्या.
Exit mobile version