। मुंबई । वृत्तसंस्था ।
कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनने संपूर्ण जगावर भीतीचं सावट निर्माण केलं असताना डेल्टाच्या तुलनेत तो कमी धोकादायक असल्याने अनेकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. मात्र जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख ट्रेड्रोस गेब्रेयसस यांनी मात्र ओमायक्रॉनमुळे संपूर्ण जगभरात मृत्यू होत असताना सौम्य म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करु नका असा इशारा दिला आहे. ट्रेड्रोस गेब्रेयसस यांनी करोनाचा नवा व्हेरियंट वेगाने संसर्ग फैलावत असून मोठ्या प्रमाणात लोकांना लागण होत असल्याचं सांगितलं आहे.
लसीकरण झालेल्यांना कमी धोका
“ओमायक्रॉन डेल्टाच्या तुलनेत आणि खासकरुन लसीकरण झालेल्यांमध्ये कमी गंभीर असल्याचं दिसून येत आहे, पण याचा अर्थ त्याला सौम्य म्हणून दुर्लक्षित करावं असा होत नाही,” असंही ट्रेड्रोस यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं. “मागील अनेक व्हेरियंटप्रमाणे ओमायक्रॉनदेखील लोकांना रुग्णालयात दाखल होण्यास भाग पाडत असून मृत्यूसाठी जबाबदार ठरत आहे,” असा इशारा त्यांनी यावेळी दिला.