। संगमेश्वर । प्रतिनिधी ।
तालुक्यातील आरवली, कडवई, माखजन, कसबा आणि देवरूख शहरात गावभेट दौरा तसेच प्रचारफेरी आणि डोअर टू डोअर गाठीभेटी अशा पद्धतीने महाविकास आघाडीने नियोजन केल्यामुळे वातावरण ढवळून काढले आहे. विधानसभा निवडणूक आता काही दिवसांवर येऊन ठेपली असल्याने प्रचारात रंगत येऊ लागली आहे. चिपळूण मतदार संघात महाविकास आघाडी विरूद्ध महायुती अशी थेट लढत होत आहे.
महायुतीकडून शेखर निकम तर महाविकास आघाडीकडून प्रशांत यादव मैदानात उतरले आहेत. या मतदार संघात चिपळूण 151 बूथ तर संगमेश्वर तालुक्यात 149 बूथ आहेत. त्यामुळे दोन्ही तालुक्यातील मतदान काही प्रमाणात समसमान आहे. मतदानाच्या सरासरीत संगमेश्वर तालुका महत्वाची भूमिका बजावणार असल्यामुळे दोन्ही उमेदवारांचे लक्ष संगमेश्वर तालुक्याकडे लागले आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत यादव यांनी शनिवारी सकाळी आरवली बाजारपेठ येथून सुरुवात केली.
व्यापारी तसेच नागरिकांच्या गाठीभेटी घेतल्यानंतर माखजन बाजारपेठेतदेखील त्यांनी प्रचार फेरी काढत व्यापारी व मतदारांच्या भेटी घेतल्या आहेत. आरवली, माखजननंतर कडवई जिल्हा परिषद गटात महाविकास आघाडीकडून गावभेट कार्यक्रम राबवण्यात आला. सायंकाळी कसबा येथे गावभेट दौरा करत येथील कालभैरव मंदिराच्या समोरील सभागृहात बैठकघेण्यात आली.