पोल्ट्रीच्या दुर्गंधावर सेंद्रिय खतांची मात्रा

कर्जतमधील तरूणाच्या प्रयोगाला यश
। नेरळ । प्रतिनिधी ।
पोल्ट्री फार्ममधील दुर्गंधीमुळे लोक त्रस्त असतात, मात्र कर्जत तालुक्यातील तरुणाने सेंद्रिय खतांच्या माध्यमातून पोल्ट्री फार्ममधील दुर्गंधी कमी झाली आहे.तर सेंद्रिय पिकांसाठी हेमंत कोंडिलकर या तरुणाने सेंद्रिय खतांची निर्मिती केली आहे. सेंद्रिय शेतीचे आपल्या आरोग्यात असलेले महत्व लक्षात घेऊन कर्जत तालुक्यातील बार्डी गावातील पदवीधर तरुणाने सेंद्रिय खते निर्माण करण्याचा निर्णय घेतला आणि नवी मुंबईतील उच्च पगाराची नोकरी सोडून सेंद्रिय शेतीकडे वळला. त्यामागे देखील एक कारण असून कोंडिलकर या तरुणाचे काका हे आजारी पडल्याने त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आणि त्यावेळी त्यांच्यावर उपचार करणार्‍या डॉक्टरांनी कोंडिलकर यांच्या पोटात विषारी घटक अन्नातून गेले असल्याने तो आजार झाला आहे असे स्पष्ट केले. शेतीची आवड असलेल्या या तरुणाने मग कर्जत तालुक्यातील गणेगाव येथील साई आनंद प्रेम आश्रमात सूरु केलेल्या कंपोस्ट खत, घनजिवामुत, दशपर्णी अर्क यांचा वापर करून सेंद्रिय खत निर्मिती करणारा प्रकल्प सुरू केला. केवळ खताची निर्मिती करुन चालणार नव्हते तर त्या खतांचा वापर आपल्या शेतीत करून त्यातून चांगले उत्पन्न शेतकर्‍यांना मिळविता आले पाहिजे हे आपल्या शेतीत प्रयोग करून हेमंत यांनी सिद्ध केलेले आहे.त्याचवेळी त्यांनी गावोगाव फिरून प्रयोगशील शेती करणार्‍या शेतकर्‍यांच्या घरी जाऊन सेंद्रिय खतांचे महत्व पटवून दिले आणि शेतकर्‍यांना सेंद्रिय खते वापरण्यास तयार केले.


कर्जत, अंबरनाथ, खालापूर, पनवेल आणि मुरबाड तालुक्यातील शेतकर्‍यांना त्यांचा सेंद्रिय खतांचा वापर करून घेतलेल्या पिकांमुळे झालेला फायदा लक्षात घेऊन शेतकरी आता सेंद्रिय खते कुठे मिळणार याकडे आपला कल वळवू पाहत आहेत. तसेच या प्रयोगशील शेतकर्‍याच्या या कल्पनेला तालुक्यातील इतर शेतकरी देखील वापरात आणणार असल्याने पोल्ट्रीधारकांना दिलासा मिळणार आहे.

Exit mobile version