| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील बागमळा येथील महालक्ष्मी मंदिरामध्ये नवरात्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होत आहेत. त्यानिमित्त महालक्ष्मी मंदिरात उद्या रविवारी (दि. 28) सप्टेंबर रोजी डबलबारी भजनांच्या जंगी सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम दुपारी दोन वाजता होणार असल्याची माहिती आयोजक अनंत घरत यांनी दिली.
मुरुड तालुक्यातील जय हनुमान प्रासादिक भजन मंडळ खारीकपाडा व अलिबाग तालुक्यातील स्वरानंद प्रासादिक भजन मंडळांमध्ये भजनाचे जंगी सामने होणार आहेत. जय हनुमान प्रासादिक भजन मंडळाचे बुवा अजय दामोदर राऊत (गुरुवर्य शंकर राऊत, गुरुवर्य कृष्णा देशमुख यांचे शिष्य), पखवाज वादनकार सागर राऊत, तबलावादक केशव राऊत, तर स्वरानंद भजन मंडळाचे बुवा मनोहर रमेश भोईलकर यांना मृदुंगमणी म्हणून सुयोग खंडागळे, विजय शिंदे साथ संगत करणारत आहे. मंडळाचे सुरेश टोपले हे अध्यक्ष म्हणून काम पाहात आहेत.
बागमळा येथील महालक्ष्मी मंदिर एक जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. नवरात्र, मार्गशीर्ष महिन्यासह इतर दिवशीही देवीच्या दर्शनासाठी भाविकांची कायम गर्दी दिसून येते. भाविकांची या देवीवर अपार श्रद्धा असल्याने संपूर्ण महाराष्ट्रभरातून भाविक दर्शनासाठी येत असतात. नवरात्रोत्सवात तर नऊ दिवस धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या कालावधीत खाद्यपदार्थांपासून हार-फुले, तसेच खेळण्यांची दुकानेही थाटली जातात. यामुळे मंदिर परिसराला यात्रेचे स्वरुप प्राप्त होते.
हाकेला धावणारी आणि नवसाला पावणाऱ्या अशा आई महालक्ष्मीवर चौलमळा गावचे माजी पोलीस पाटील अनंत घरत यांची अपार श्रद्धा असून, ते देवीचे परमभक्त आहेत. दरवर्षी नवरात्रात ते सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करुन देवीचा जागर करीत असतात. यंदाही देवीच्या मंदिरात रविवारी भजनांचा कार्यक्रम आयोजित केला आहे. भजनप्रेमींना भजनांचा आनंद घ्यावा, असे आवाहन अनंत घरत यांनी केले आहे. हा कार्यक्रम यशस्वी व्हावा यासाठी अमोल घरत यांच्यासह चौलमळा व बागमळा ग्रामस्थ जोरदार तयारी सुरू आहे.







