राजकीय आखाड्यात डबल महाराष्ट्र केसरी

| सांगली | वृत्‍तसंस्था |

डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्या रुपाने कुस्तीच्या आखाड्यातील यशवंत मल्ल सांगलीची लोकसभा निवडणूक लढवतो आहे. विधानसभा आणि लोकसभेसारख्या मोठ्या आखाड्यात जिल्ह्यातील मोजक्या मल्लांनी आपले नशीब आजमावले. त्यात बिजलीमल्ल संभाजी पवार आणि खासदार संजय पाटील हे सर्वांत यशस्वी पैलवान मानले जातात. खासदार संजय पाटील कुस्तीपेक्षा राजकीय आखाड्यात अधिक यशस्वी झाले. हिंदकेसरी मारुती माने राज्यसभेत गेले; मात्र त्यांना लोकसभेची कुस्ती जिंकता आली नाही. कुस्ती आणि महाराष्ट्राची संस्कृती याचं जुनं नातं आहे. कुस्ती हा रांगडा खेळ इथल्या मातीतला. गावागावांत पैलवानांना प्रचंड मान-सन्मान. त्यांच्याबद्दल आदर, दरारा आणि त्यांचे वजनही तेवढेच. त्यामुळे पैलवानांना गावापासून ते जिल्ह्यापर्यंत राजकारणात संधी देण्याचा प्रयत्न अनेक मातब्बर नेत्यांनी केला.

आज पुन्हा एक पैलवान मैदानात उतरला आहे. मिरजेतील शिवसेनेच्या जनसंवाद मेळाव्यात उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी, कुस्ती, पैलवान आणि राजकारण हे जवळचे नाते असल्याचा उल्लेख केला. राजकीय आखाड्यात पैलवानांचा केवळ वापर केला गेला. फार कमी पैलवानांना संधी मिळाली, असाही उल्लेख झाला. यावेळी, चंद्रहार पाटलांच्या रुपाने एका पैलवानाला संधी देतोय,असे ते म्हणाले. याआधी कुस्तीचा आखाडा गाजवत असलेल्या पैलवानाला राजकीय आखाड्यात खांद्यावर घेण्याची पहिली मोठी खेळी झाली, ती संभाजी पवार यांच्या रुपाने. वसंतदादा पाटील राजस्थानचे राज्यपाल झाले. सांगली विधानसभेची पोटनिवडणूक लागली. विष्णुअण्णा पाटील यांना काँग्रेसने उमेदवारी दिली. संभाजी पवार नवखे होते, मात्र विरोधकांचा चेहरा म्हणून त्यांना मैदानात उतरवण्यात आले. आबासाहेब खेबुडकर यांनी विरोधकांची मोट बांधली.

हिंदकेसरी मारुती माने, राजाभाऊ जगदाळे, व्यंकाप्पा पत्की आदी मंडळींनी त्यांच्या मागे प्रचंड ताकद उभी केली. पाहता-पाहता निवडणूक उभी राहिली आणि लाल मातीत बिजली चमकावी, तशी झटकन कुस्ती करणारे संभाजी पवार सर्वांना धक्का देत आमदार झाले. पुढे, चार वेळा ते विधानसभेत गेले. जिल्ह्यात भाजप उभी करण्याचे काम त्यांनी केले. हिंदकेसरी मारुती माने यांचा कुस्ती क्षेत्रात देशभर दबदबा होता. एखादा छाती पुढे काढून रुबाबात चालायला लागला तर लोक त्याला, मारुती माने लागून गेलास काय? असं म्हणायचे. मारुती माने यांना वसंतदादांनी राज्यसभा सदस्य करून त्यांचा सन्मान केला. पुढे, 1996 मध्ये मारुती माने यांनी अपक्ष लोकसभेची निवडणूक लढली, मात्र वसंतदादांचे चिरंजीव प्रकाशबापू पाटील यांनी त्यांचा पराभव केला. मारुतीभाऊ जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष, वसंतदादा कारखान्याचे उपाध्यक्ष होते.

खासदार संजय पाटील हे कुस्तीपेक्षा अधिक राजकारणात प्रभावी ठरले. युवक काँग्रेसचे अध्यक्ष, सांगली नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष, विधान परिषदेचे आमदार आणि दोनवेळा खासदार म्हणून त्यांची राजकीय कमान चढती राहिली आहे. मात्र राजकारणात संजय पाटील, संभाजी पवार आणि मारुती माने यांच्याइतके यश अन्य मल्लांच्या नशिबी आले नाही. हिंदकेसरी गणपतराव आंदळकर, वनश्री नाना महाडिक, डबल महाराष्ट्र केसरी गणपतराव खेडकर, महाराष्ट्र केसरी दिनकर दह्यारी, महाराष्ट्र केसरी आप्पासाहेब कदम, भारतभीम ज्योतिरामदादा सावर्डेकर, कडेगावचे साहेबराव यादव, भीमराव माने, किसनराव पाटील यांच्यासह अनेक मंडळी राजकीय आखाड्यात प्रभावी ठरली. त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणात आपला दबदबा निर्माण केला. अलीकडच्या काळात पृथ्वीराज पवार हे विधानसभेसाठी धडक देत आहेत.

डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील जिल्हा परिषद सदस्य होते, मात्र जिल्हा परिषदेच्या कारभारात त्यांना फार वेळ देता आला नव्हता. तेव्हा ते कुस्तीच्या आखाड्यात व्यस्त असायचे. आता ते थेट लोकसभेच्या आखाड्यात उतरले आहेत. त्यांच्यासाठी एवढा मोठा डाव नवा आहे; मात्र शिवसेनेचे बळ पाठीशी राहिले आहे. महाविकास आघाडीची उमेदवारी मिळाली आहे. हा पैलवान या आखाड्यात यश मिळवतो का, याकडे जिल्ह्याचे लक्ष असेल.

Exit mobile version