सोन्याच्या हव्यासापोटीच दुहेरी हत्याकांड

सावंतवाडी येथील घटना
आरोपीकडून गुन्ह्याची कबूली

। सिंधुदुर्ग । वृत्तसंस्था ।
जिल्ह्यातील सावंतवाडी शहरात घडलेल्या दुहेरी हत्याकांड प्रकरणाचे गूढ बहुदिवशीय नाट्यमय परिस्थितीनंतर उजेडात आले आहे. या प्रकरणातील, आरोपीने सोन्याच्या हव्यासापोटी गुन्हा केल्याचा कबुलीजबाब पोलिसांना दिला आहे. राज्याचे लक्ष लागलेल्या या घटनेतील संयशित आरोपी, जो दोन वेळा नाट्यमय पद्धतीने बेपत्ता झाला होता, तोच गुन्हेगार असल्याचे पोलीस तपासात सिद्ध झाले असून, कुशल ऊर्फ विनायक नागेश टंगसाळी (34) असे त्याचे नाव आहे.
मागील दोन आठवड्यांपूर्वी सावंतवाडी शहरातील उभाबाजार परिसरात राहणार्‍या नीलिमा खानविलकर व शालिनी सावंत यांचा गळ्यावर वार करून खून करण्यात आला होता. या खुनाच्या तपासासाठी अनेकांची चौकशी करण्यात आली. त्यानंतर याच तरुणाला याप्रकरणी पोलिसांनी चौकशीसाठी बोलविण्यात आले होते.
चौकशीसाठी बोलाविल्यानंतर कुशल याने विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्याच्यावर उपचार करण्यात आले. तेथून त्याला घरी सोडण्यात आले, मात्र पुन्हा तो बेपत्ता झाला. हा प्रकार नऊ नोव्हेंबरला घडला. त्याच्या मोबाईलचे लोकेशन आंबोली घाटाजवळ मिळत होते. पोलिसांनी तेथे शोधमोहीम राबवूनही फारसे काही हाती आले नाही. नंतर तो मुंबईत असल्याचे कळाले. त्यावरून त्याला मानखुर्द येथून ताब्यात घेण्यात आले.
पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली. त्यानंतर त्याने खुनाची कबुली दिली. खानविलकर यांच्या गळ्यातील सोन्याच्या चेनसाठी त्याने सुरीने दोघींच्या गळ्यावर वार करून खून केले. त्याने लपवून ठेवलेले हत्यार व सोने पोलिसांनी जप्त केले आहे. याप्रकरणी पोलिसांचा अधिक तपास सुरू असून, यापूर्वी सुमारे 40 जणांची चौकशी करण्यात आली आहे.

Exit mobile version