गारपोली येथील डीपी कोसळली; विजेचा धक्का लागण्याची शक्यता

। नेरळ। वार्ताहर ।
कर्जत तालुक्यातील उमरोली ग्रामपंचायत मधील गारपोली गावाला वीज पुरवठा करणार्‍या वीज रोहित्र असलेली डीपी सडलेली असून ती पेटी खाली कोसळली आहे. त्यामुळे त्या भागातून जाणार्‍या जनावरे यांना विजेचा धक्का लागण्याची शक्यता असल्याने महावितरण विभागाने त्या वीज रोहित्र भागात नवीन पत्रे बसविण्यात यावेत अशी मागणी रायगड भूषण किशोर गायकवाड यांनी महावितरण कंपनीच्या नेरळ कार्यालयाला दिलेल्या पत्रात केली आहे.
महावितरणच्या नेरळ येथील शाखा अभियंता यांच्या कार्यकक्षेत असलेल्या उमरोली ग्रामपंचायत मधील गारपोली गावाला वीज पुरवठा करणारे वीज रोहित्र यांच्यावर असलेली लोखंडी पेटी कोसळून खाली पडली आहे. अनेक वर्षे ऊन पाऊस सहन करणारी त्या लोखंडी पेटीचे पत्रे सडून गेले असल्याने वीज रोहित्र सोडून ती पेटी कोसळली आहे. त्या भागातून स्थानिकांची गुरे ये-जा करीत असतात. त्या गुरांना उघड्यावर असलेल्या वीज रोहित्राचा धक्का बसू शकतो. त्यात अपघात होण्याची देखील भीती असते आणि त्यामुळे पावसाळा सुरु होण्याअगोदर महावितरण कंपनीने त्या वीज रोहित्राला नवीन लोखंडी पेटी बसवावी अशी मागणी किशोर गायकवाड यांनी महावितरणकडे केली आहे.

Exit mobile version