। अलिबाग । प्रतिनिधी ।
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती सोमवारी (दि.14) रायगड जिल्ह्यात ठिकठिकाणी साजरी करण्यात आली. जयंती निमित्त सभा, सांस्कृतिक व गुणगौरव कार्यक्रमांचा जल्लोष जिल्ह्यामध्ये पहावयास मिळाला. एक वेगळा उत्साह अनुयायींमध्ये दिसून आला. यावेळी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक अशा सर्वच क्षेत्रातील मंडळींकडून महामानवाला अभिवादन करण्यात आले.

अलिबागमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.यावेळी शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख अॅड. मानसी म्हात्रे, अॅड. गौतम पाटील, वृषाली ठोसर, प्रदिप नाईक, अनिल चोपडा, आदी मान्यवर, पदाधिकारी उपस्थित होते. तसेच अलिबाग नगरपरिषदेमध्येदेखील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी नगरपरिषद कर्मचारी उपस्थित होते.
अलिबागमधील नालंदा बुध्द विहारामध्ये जयंती महोत्सव साजरा करण्यात आला. भारतीय बौध्द महासभा तसेच बौध्दजन पंचायत समितीच्या वतीने अलिबागसह जिल्हयात ठिकठिकाणी जयंती साजरी करण्यात आली. अलिबाग तालुक्यातील महाजने, रामराज, गोविंद बंदर, बेलकडे, आरसीएफ कर्मचारी वसाहतीमधील बुध्द विहार तसेच जिल्ह्यातील पेण, पनवेल, कर्जत, खालापूर, महाड, माणगांव, रोहा, तळा, म्हसळा अशा अनेक तालुक्यांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. बेलोशी ग्रामपंचायत, महाजने बौध्द ग्रामस्थ तसेच मल्याण येथील बौध्द ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायतीच्या सभागृहात जयंती साजरी करण्यात आली. यावेळी महामानवाच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. दरम्यान महाजने येथील जिल्हा परिषद शाळेच्या वतीने गावामध्ये प्रभात फेरी काढण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जयघोष करण्यात आला. यावेळी शाळेतील शिक्षिका, शिक्षक आदी उपस्थित होते. जिल्ह्यामध्ये 340 ठिकाणी जयंती साजरी करण्यात आली. त्यामध्ये 76 ठिकाणी महामानवाच्या पुतळ्यांचे आणि 263 प्रतिमेंचे पूजन करण्यात आले. त्यानंतर सायंकाळी 94 ठिकाणी मिरवणुका काढण्यात आल्या. या मिरवणुकांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जयघोष करण्यात आला. यावेळी कोणताही कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, म्हणून जिल्ह्यात पोलिसांचा कडेकोट पहारा ठेवण्यात आला.