। अलिबाग । वार्ताहर ।
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्ताने अलिबाग मल्याण येथील तथागत क्लब व माता रमाई महिला मंडळाच्यावतीने कार्यक्रम आयोजित केला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वकिलीचा सर्वात जास्त फायदा आगरी, कोळी समाजाला झाल्याचे अॅड. राकेश पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले.
यावेळी काँग्रेसचे नेते राजा ठाकूर, शिवसेना नेते संतोष निगडे, बेलोशी ग्रामपंचायतीचे सरपंच कृष्णा भोपी, अॅड. डॉ. सचिन पाटील, गिरीष पाटील व आगरी समाजाचे तरुण साहित्यिक नंदेश गावंड, उज्ज्वला सांदणकर, ताई गडकर, माजी सरपंच कविता पाटील तसेच मल्याण, बेलोशी, घोटवडे गावचे ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी बोलताना अॅड. पाटील म्हणाले की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वकिलीचा जास्त फायदा आगरी, कोळी, कराडी, तेली, माळी, बहुजन समाजास झाला आहे. रायगड जिल्ह्यासह कोकणातील शेतीबरोबरच शैक्षणिक बदल घडविण्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान मोलाचे आहे. खोतीविरुद्ध लढून शेती कसणार्या बेदखल कुळांना जमिनींचे मालकी अधिकार मिळवून देणारा ङ्गकुळकायदाफ निर्माण करण्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या साथीने अलिबागच्या नारायण नागू पाटील यांनी इतिहास घडविला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सुट्टीच्या काळात नारायण नागू पाटील यांच्या पोयनाडच्या घरी हक्काने बोंबील, जिताडा, तांदळाची भाकरी खायला येत. डॉ. बाबासाहेबांच्या सहवासाचा परिणाम अॅड. दत्ता पाटील, प्रभाकर पाटील यांच्यावर झाला, अॅड. राकेश पाटील यांनी सांगितले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष राजा ठाकूर, साहित्यिक नंदेश गावंड, बेलोशी सरपंच कृष्णा भोपी यांनी आपले विचार मांडले. यावेळी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्यात आले. तर, आंतरजातीय विवाह करणार्या नवदाप्त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण मोरे यांनी केले.







