डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणाचा आज निकाल

। पुणे । वृत्तसंस्था ।

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली आहे. जिल्हा व सत्र न्यायालयात यावर सुनावणी सुरू होती. ती आता पूर्ण झाल्याने आज शुक्रवारी (दि.10) या प्रकरणी निकाल लागणार असून, आरोपींना काय शिक्षा होणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

डॉ. दाभोलकर मॉर्निंग वॉकला गेले असताना 20 ऑगस्ट 2013 रोजी त्यांचा गोळ्या झाडून खून करण्यात आला. या घटनेने अवघे राज्य हादरले. दाभोलकरांच्या खुनानंतर तब्बल आठ वर्षांनी हा खून खटला सुरू होण्यास मुहूर्त लागला. खुनाचा तपास पूर्ण होऊन पुण्यातील विशेष न्यायालयाने 5 आरोपींविरोधात आरोप निश्‍चित केले आणि खटल्यास सुरुवात झाली. जवळपास अडीच वर्षांपासून हा खटला चालू होता. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा खून झाला होता. सुरुवातीच्या काळात पुणे पोलिस या खुनाचा तपास करीत होते. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या आदेशावरून या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविण्यात आला.

15 सप्टेंबर 2021 रोजी डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर, संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे या पाच जणांवर आरोप निश्‍चित करण्यात आले. तावडे, अंदुरे, कळसकर आणि भावे यांच्यावर भारतीय दंडसंहिता (आयपीसी) कलम 302 (हत्या), 120 (बी) (गुन्ह्याचा कट रचणे), 34 नुसार आणि शस्त्र अधिनियम संबंधित कलमांतर्गत आणि यूएपीए अंतर्गत गुन्हे दाखल आहेत. यातील संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे हे दोन आरोपी सध्या जामिनावर बाहेर आहेत.

दरम्यान, सुरुवातीला या खटल्याची सुनावणी वर्षभर जिल्हा न्यायाधीश एस.आर. नावंदर यांच्या न्यायालयात सुरू होती. त्यानंतर नावंदर यांची बदली झाल्याने सध्या पी.पी. जाधव यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरू आहे. सीबीआयचे वकील प्रकाश सूर्यवंशी यांनी या प्रकरणात 20 साक्षीदार तपासले. बचाव पक्षाचे वकील प्रकाश साळसिंगीकर, वीरेंद्र इचलकरंजीकर आणि सुवर्णा आव्हाड यांनी काम पाहिले. त्यांनी 2 साक्षीदार न्यायालयात उभे केले. आता या खटल्याचे कामकाज पूर्ण झाले असून, आज (दि.10) रोजी दाभोलकर खटल्याचा निकाल लागणार आहे.

Exit mobile version