जन्मशताब्दीवर्षानिमित्त चिपळूणमध्ये स्वच्छता अभियान
तब्बल 33 टन कचर्याचे संकलन
। चिपळूण । संतोष पिळके ।
महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दीवर्षानिमित्त चिपळूणमध्येे स्वच्छता अभियान राबविण्यात आले आहे. या अभियानाअंतर्गत समाजप्रबोधनातून अंतर्बाह्य स्वच्छतेची शिकवण देणार्या नानासाहेबांना स्वच्छतेतून आदरांजली वाहण्यात आली असून, तब्बल 33 टन कचर्याचे संकलन करण्यात आले आहे.
रायगड जिल्ह्यातील रेवदंडा येथील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे संपूर्ण महाराष्ट्रात एकाच दिवशी व एकाच वेळी हे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. चिपळूण तालुक्यातील 422 सदस्यही या अभियानात सहभागी झाले होते.
अभियानाच्या शुभारंभप्रसंगी पंचायत समितीचे उपसभापती प्रतापराव शिंदे यांनी डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या सामाजिक कार्याचा आणि प्रतिष्ठानच्या कामकाजाचा गौरव केला. तसेच त्यांचे अनुयायी सामाजिक जाणिवेतून विविध उपक्रम राबवित असलेल्याने श्री सदस्यांच्याही कामाचे विशेष कौतुक केले.

चिपळूणमधील प्रांत ऑफीस, पंचायत समिती, तहसिदार कार्यालय, पोलीस स्टेशन आदी ठिकाणचा परिसर तसेच बहाद्दुरशेख नाका, काविळतळी, युनायटेड इंग्लिश स्कूल मार्कंडी, चिंचनाका, चिपळूण नगर परिषद, काणे हॉटेल, बाजारपेठ मुख्य रस्ता, गांधीचौक, पानगल्ली आतील रस्ता, नाईक कंपनी, गुहागर नाका, पुन्हा गांधी चौकाकडे जाणारा रस्ता, त्यानंतर उक्ताड गणेशमंदीर परीसर, अर्बन बँक, परांजपे हायस्कूल गुहागर नाका, रंगोबा साबळे रोड मुख्य रस्ता, खाटीक गल्ली, पॉवर हाऊस, बुरूमतळी, भोगाळे आदी परिसरात ही स्वच्छता मोहीम राबवली. या अभियानाला नगर पालिकेचे मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांच्यासह प्रशासकीय अधिकारी प्रमोद ठसाळे, अनंत पवार व आरोग्य विभागाचेही सहकार्य लाभले.
कचर्याचे संकलन
श्रीसदस्यांनी या अभियानातून 12.3 कि. मी. चे रस्ते तर 16741 चौ. से. मी. चा शासकीय परिसर चकाचक केला. तर त्यातून 7 हजार 200 किलो ओला कचरा, 25 हजार 700 किलो सुका कचरा असा एकूण 32 हजार 900 किलो म्हणजेच 32 टन 900 किलो कचरा गोळा केला.







