। अलिबाग । प्रतिनिधी ।
जिल्हा सामान्य रुग्णालयात अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सकाचा प्रभार सांभाळणार्या डॉ. शीतल जोशी यांच्याकडे आता पूर्ण वेळ अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक म्हणून शासनाने जबाबदारी सोपविली आहे. नुकतेच त्यांना याबाबतचे नियुक्तीपत्र देण्यात आले असून, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अंबादास देवमाने यांच्याकडून त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.
डॉ. शीतल जोशी गेल्या अनेक वर्षांपासून वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर सुरुवातीला रायगड जिल्ह्यातील माणगावमधील इंदापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून रूजू झाल्या. त्यांनी सेवांतर्गत पदव्युत्तर (एम.डी. पॅथॉलॉजी) शिक्षण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून रुग्णालयात पूर्ण केले. त्यानंतर त्यांची नियुक्ती जिल्हा सामान्य रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून झाली. प्रयोगशाळा विभाग प्रमुख, रक्तपेढी विभाग प्रमुख म्हणून त्यांनी सक्षमपणे जबाबदारी सांभाळली. कोरोना महामारीच्या काळात जिल्ह्याच्या कोव्हिड प्रयोगशाळेच्या स्थापनेपासून संपूर्ण कामकाज उत्तमरित्या सांभाळून रुग्णांना चांगली सेवा देण्याचा प्रयत्न केला. जिल्हा रुग्णालयातील अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सकपद रिक्त होते. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अंबादास देवमाने यांच्या मार्गदर्शनाखाली मागील वर्षभरापासून अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक म्हणून अतिरिक्त जबाबदारी यांच्याकडे सोपविण्यात आली होती. त्यांनी वर्षभरात ही जबाबदारी खंबीरपणे सांभाळत कर्मचार्यांसह रुग्णांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे. रुग्णांना अधिक चांगली सेवा मिळावी यासाठी ते कायमच प्रयत्नशील राहिले आहेत. नुकतीच त्यांची पूर्णवेळ अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक म्हणून नेमणूक झाली आहे. डॉ. अंबादास देवमाने यांच्याकडून त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.