। रायगड । प्रतिनिधी ।
नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी येत्या शैक्षणिक वर्षात सर्वच पदवी अभ्यासक्रमांसाठी लागू केली जाणार आहे. त्यामुळे या धोरणात पदवीच्या अभ्यासक्रमांसाठी असलेल्या सहा आणि बारा महिन्यांच्या इंटर्नशिपसाठीच्या धोरणाचा मसुदा उच्च व तंत्र शिक्षण विभागाने तयार केला आहे. या मसुद्यासाठी विभागाकडून सूचना मागविण्यात आल्या असून त्यानंतर तो मंजूर केला जाणार आहे. या मसुद्यानुसार राज्यातील सर्व महाविद्यालयांवर इंटर्नशिप आणि विविध प्रकारच्या कामाच्या संधी शोधण्याची जबाबदारी ही संबंधित वरिष्ठ महाविद्यालयांवर सोपविण्यात आली आहे.
‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020’नुसार शैक्षणिक अभ्यासक्रमाबरोबरच विद्यार्थ्यांना व्यावहारिक कामाचा अनुभव असणे अधोरेखित केले आहे. त्यामुळे राज्य सरकारने इंटर्नशिपसाठीच्या धोरणाचा मसुदा जाहीर केला आहे. हा मसुदा विद्यापीठाच्या कुलगुरू आणि स्वायत्त महाविद्यालयांच्या प्राचार्यांना माहितीसाठी पाठविण्यात आला असून त्यांच्याकडून हरकती आणि सूचनादेखील मागविण्यात येणार आहेत. चालू शैक्षणिक वर्षापासून उच्च शिक्षण संस्थांमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरू झाली आहे.
राज्यातील सर्व उच्च शिक्षण संस्थांमध्ये इंटर्नशिप सेल स्थापन करण्याची तरतूद मसुद्यात मांडण्यात आली आहे. यात संस्थेचे प्रमुख, एक नोडल अधिकारी तसेच प्राध्यापक आणि विद्यार्थी समन्वयक यांचा समावेश आहे. शिक्षण संस्था स्थानिक उद्योगांमध्ये उपलब्ध प्रकल्पाचा शोध घेईल आणि त्यांच्यासाठी विद्यार्थ्यांची नोंदणी करेल. इतर गोष्टींबरोबरच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी, संभाषण कौशल्यात सुधारणा करण्यासाठी आणि त्यांना मुलाखतीसाठी तयार करण्यासाठी इंटर्नशिप सेल काम करणार आहे. इंटर्नशिप पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण कालावधीत मिळालेल्या अनुभवांवर सर्वसमावेशक अहवाल तयार करायचा आहे.
अभियांत्रिकीसाठीही नव्या धोरणानुसार अभ्यासक्रम जाहीर करण्यात आला आहे. विविध विद्यापीठे आणि वरिष्ठ पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकणारे विद्यार्थी चार ते सहा आठवडे सरकारी, खासगी ना नफा तत्त्वावरील संस्थेत काम करू शकतात. तर दुसरीकडे मुंबई विद्यापीठातील 62 महाविद्यालयांसह राज्यातील सर्व स्वायत्त महाविद्यालयांमध्ये पदवीसाठी नवीन धोरणाची अंमलबजावणी सुरू आहे. मात्र त्यांच्याकडे अजूनही इंटर्नशिप संदर्भात धोरण नसल्याने संभ्रम होता, आता तो संभ्रमही दूर होणार आहे.
इंटर्नशिपचे लाभ इंटर्नशिपसाठी पदवी अभ्यासक्रमांमध्ये 12-14 शैक्षणिक क्रेडिट आणि पदव्युत्तरमध्ये 10-12 क्रेडिट्स दिले जातील. राज्याने इंटर्नशिप अंतर्गत औद्योगिक प्रशिक्षण, शैक्षणिक आणि उद्योग संशोधन प्रकल्प, उद्योजकता, चर्चासत्रे, समुदाय सहभाग. आणि सरकार, सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योग आणि ना-नफा संस्थांसोबत काम करणे यासह अनेक उपक्रम निर्धारित केले आहेत. उन्हाळ्यातील 4-8 आठवडे आणि हिवाळ्यातील 2-4 आठवडे प्रशिक्षण असेल. पदव्युत्तर विद्यार्थ्यांना उन्हाळ्यात 4 ते 6 आठवडे उन्हाळी इंटर्नशिप घेणे आवश्यक आहे.