| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत शहरात असलेल्या 30 किलोमीटर लांबीच्या नाल्याची सफाई पावसाळापूर्व कामांमध्ये केली जात आहे. पावसाळा तोंडावर आल्याने शहरातील उपनाल्यांची सफाई जवळपास पूर्ण झाली असून, मुख्य नाल्यांची सफाई पालिकेच्या आरोग्य विभागाकडून सुरु आहे. दरम्यान, जेसीबी मशीन आणि कंत्राटी कामगार यांच्या सहाय्याने नालेसफाई सुरु झाली आहे. बाजारपेठ भागातील गटारे मनुष्यबळ वापरून, तर शहरातील मोठ्या नाल्यांची जेसीबी मशीनच्या माध्यमातून सफाई सुरु आहे.
कर्जत नगरपरिषद क्षेत्रातून उल्हास नदी वाहात असून, पावसाळ्यात होणार्या अतिवृष्टीच्या काळात शहरातील काही भागात पावसाचे पाणी शिरते. जुलै 2021 मध्ये आलेल्या महापुरामध्ये उल्हास नदीचे पाणी नागरी वस्तीत घुसले होते, त्यात पूर येऊन दहीवली, इंदिरानगर बामचामळा, मुद्रे गुरुनगर तसेच कर्जत कोतवालनगर भागात पुराचे पाणी शिरुन काही कुटुंबांचे नुकसान झाले होते. त्यामुळे सन 2022 च्या पावसाळ्यात संभाव्य नैसर्गिक आपत्तीच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात येत आहेत. नगरपरिषद क्षेत्रात पावसाचे पाणी साठून काही हानी होऊ नये यासाठी नगरपरिषद क्षेत्रातील सर्व नाले आणि गटारांची पावसाळ्यापूर्वी जेसीबी व कामगारांव्दारे साफसफाईचे काम पालिकेने हाती घेतले असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे.
कर्जत शहरात 6 मुख्य नाले व 20 इतर छोटे-मोठे नाले गटारे (अंदाजे लांबी 30 कि.मी.) असून सदर गटारांचे पावसाळ्यापूर्वी साफसफाईचे काम हाती घेतले असून, आतापर्यंत नगर परिषदेचे जेसीबीद्वारे सुरु आहे. नगर परिषद क्षेत्रात दैनदिन जंतुनाशक औषध फवारणी करण्यात येत आहे. तसेच पावसाळ्यात साथीचे रोग पसरु नये यासाठी उपाययोजना म्हणून जंतूनाशक फवारणीकामी आवश्यक जंतुनाशकांचा साठा उपलब्ध करुन ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती पालिका मुख्याधिकारी वैभव गारवे यांनी दिली आहे.
कर्जतमध्ये नालेसफाईला प्रारंभ
