| चणेरा | प्रतिनिधी |
रोहा शहरातील दमखाडी नाका परिसरात नाल्याच्या रखडलेल्या दुरुस्तीच्या कामावरून नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. दोन दिवस काम सुरू राहतं, तर त्यानंतर अनेक दिवस काम बंद पडतं! या संथ कारभाराचा फटका स्थानिक दुकानदारांना बसत असून, आता लोकप्रतिनिधींच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.
रोहा शहरातील दमखाडी नाक्याजवळील जयराम अपार्टमेंट परिसरात 30 जुलै रोजी रात्री नाल्यावरील स्लॅब अचानक कोसळला होता. या दुर्घटनेत तब्बल आठ वाहने नाल्यात पडली. वाहनांचं मोठं नुकसान झालं; मात्र सुदैवाने जीवितहानी टळली. या घटनेनंतर नगराध्यक्षा वनश्री शेंडगे, मुख्याधिकारी अजयकुमार एडके आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली होती. मात्र, बराच काळ उलटूनही दुरुस्तीच्या कामाला अपेक्षित गती मिळालेली नाही.
या परिसरात अनेक दुकाने आणि व्यावसायिक आस्थापने आहेत. दुरुस्तीच्या कामातील विलंब, वाहतुकीतील अडथळे आणि ग्राहकांची कमी झालेली वर्दळ यामुळे व्यापाऱ्यांचं आर्थिक नुकसान होत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे नुकसानभरपाईसाठी पुढाकार कोण घेणार, असा प्रश्नही आता उपस्थित होत आहे.
दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता सुनील पवार यांनी ठेकेदार आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाल्याचं सांगत, दोन ते तीन दिवसांत काम सुरू करण्याचे आदेश दिल्याची माहिती दिली होती. मात्र, काम सुरू होणं आणि ते वेळेत पूर्ण होणं यामध्ये मोठा फरक असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. एकीकडे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न, तर दुसरीकडे व्यापाऱ्यांचं आर्थिक नुकसान! त्यामुळे संबंधित विभागाने नाल्याच्या दुरुस्तीची निश्चित मुदत जाहीर करून काम तातडीने पूर्ण करावं, अशी मागणी होत आहे.
दमखाडी नाका परिसरात नाल्याचे काम रखडले
