द्रेसन जसीन्टोचा बुडून मृत्यू

| अलिबाग | वार्ताहर |

अलिबाग तालुक्यातील कामार्ले धरणात बुडून द्रेसन जसीस्टो (20) या तरुणाचा दुर्दैवीरित्या मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि. 27) घडली. द्रेसन हा मूळचा मुंबई-जुहू येथील रहिवासी असून, सध्या तो आपल्या कुटुंबासोबत भायमळा येथे वास्तव्यास होता. आपल्या मित्रासोबत तो धरणात पोहण्यास गेला होता. दरम्यान, या घटनेची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

याबाबत हकीकत अशी की, द्रेसन जसीन्टोने पोहण्यात आपण किती तरबेज आहोत हे दाखवण्यासाठी आपल्या मित्रा समवेत पोहण्याची स्पर्धा लावली. कामार्ले धरणाच्या एका टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंत जाण्यासाठी ते दोघेही पाण्यात उतरले. स्पर्धा जिंकण्याच्या आवेशात पोहताना पात्राच्या मध्यभागी आल्यावर द्रेसन दमला, त्याची दमछाक झाली, किनार्‍यावर यायच्या आधीच तो बुडू लागला, त्याच्या मित्राने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात यश आले नाही. तेथे उपस्थित असलेल्या सर्वांनी आणि मदतीला आलेल्या गावकर्‍यांनी बुडालेल्या द्रेसनचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण कोणाला यश आले नाही. दरम्यान, पोलीस निरीक्षक गजेंद्र कराडे यांनी अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था-रायगडच्या गुरुनाथ साठेलकर यांना संपर्क केला आणि द्रेसनचे शव शोधण्यासाठी मदत करण्याचे आवाहन केले. रात्रीच्या अंधारात शव शोधणे अत्यंत जिकिरीचे होते. त्यामुळे दुसर्‍या दिवशी पहाटे विजय भोसले, हनीफ कर्जीकर, अमोल कदम, राजेश पारठे, महेश भोसले हे चिमुकल्या वीर भोसले याला सोबत घेऊन सर्व संसाधनासह खोपोलीहून अलिबागच्या दिशेने रवाना झाले.

त्याच दरम्यान स्थानिक तरुण आणि आपदा मित्र, वाईल्डर वेस्ट डव्हेंचर अँड रेस्कुअर्स-कोलाडचे महेश सानप, हरेश सानप, सचिन तुपकर, सचिन म्हसकर हेदेखील मदसाठी घटनास्थळी दाखल होते. अनुभव आणि चिकाटीच्या बळावर त्यांनी अत्यंत कौशल्याने द्रेसनचा मृतदेह शोधून काढला. द्रेसनचे शव पाहून तेथे जमलेल्या नातेवाईकांना आणि मित्रमंडळींना दुःख अनावर झाले होते.

द्रेसन शव शोधणार्‍या दोन्ही टीमचे अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, खालापूर तालुक्याचे तहसीलदार आयुब तांबोळी, रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे सागर पाठक यांनी कौतुक केले.

Exit mobile version