। रत्नागिरी । प्रतिनिधी ।
गेल्या काही महिन्यांपासून विविध मंदिरात ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे कोकणातील प्रसिद्ध देवस्थान असलेल्या गणपतीपुळे मंदिरातही भाविकांना ड्रेसकोड लागू करण्यात आला असून भाविकांसाठी वेशभूषा नियमावली जाहीर झाली आहे.
गणपतीपुळे महाद्वाराजवळ मंदिर प्रशासनाकडून वेशभूषेसंदर्भात व नव्या ड्रेसकोड प्रणालीसंदर्भात बोर्ड लावण्यात आला आहे. त्यामुळे, आता भाविकांना पूर्ण पोशाख परिधान करुनच मंदिरात यावे लागणार आहे. याबाबत मंदिर प्रशासनाने भाविकांना वेशभूषेसंबंधी नियम पाळण्याचे आवाहनदेखील केले आहे.
कमी कपड्यातील ट्रीप मूड अथवा समुद्रावर जाण्यासाठी करण्यात येणारा पेहराव टाळण्याचे आवाहन देखील मंदिर प्रशासनाने केले आहे. महिला किंवा मुलींसाठी गुडघ्यांच्या वर येणारे स्कर्ट्स किंवा शॉर्ट ड्रेसेस परिधान करू नयेत, असभ्य भाषा किंवा आक्षेपार्ह चित्र असलेले कपडे टाळावे असेही सांगण्यात आले आहे. केवळ 10 वर्षांच्या आतील मुलांना ह्या नियमातून सूट असेल, असेही मंदिर प्रशासनाने म्हटले आहे.





