वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन
| रायगड | प्रमोद जाधव |
डिसेंबरमध्ये नाताळसण साजरा करण्याबरोबरच सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी पर्यटकांनी रायगडमध्ये येण्याची तयारी केली आहे. त्यामुळे डिसेंबरचा शेवटचा आठवडा संपूर्ण पर्यटकांनी फुलणार आहे. या कालावधीत रायगडमध्ये दाखल होत असताना वाहन सावकाश चालविण्याचे वाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे. जिल्ह्यातील महामार्गावर 45 ब्लॅक स्पॉट (अपघात प्रवण क्षेत्र) आहेत. वाहन चालविताना अपघात प्रवण क्षेत्राकडे दुर्लक्ष झाल्याने अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वाहतूक कोंडी देखील होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहन चालविताना काळजीपूर्वक चालवा, असे आवाहन जिल्हा वाहतूक शाखेकडून करण्यात येत आहे.
रायगड जिल्हा पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाचा ठरत आहे. जिल्ह्यात औद्योगिकरण देखील झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे नागरिकीकरण देखील वाढू लागले आहे. जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यांसह कोकणातील पर्यटन स्थळी जाणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. शनिवार व रविवारी तसेच अन्य सुट्टीच्या दिवशी अलिबागसह जिल्ह्यातील वेगवेगळ्या पर्यटनस्थळी पर्यटक फिरण्यास येतात. कोकणातही पर्यटक फिरण्यासाठी जातात. त्यामुळे महामार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असते. काही वाहन चालक निश्चितस्थळी लवकर पोहचण्याच्या नादात वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करतात. त्यामुळे अपघात होण्याची भीती कायम असते.
मुंबई-गोवा महामार्गासह, मुंबई-पूणे द्रुतगती, राष्ट्रीय महामार्गावरील काही वळणाच्या ठिकाणी सुसाट वाहने चालविली जातात. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून वाहने चालविल्याने अपघात होऊन काहींना जीव गमवावा लागतो. तर काहींना जखमी होऊन कायमचे अपंगत्व प्राप्त होते. अपघात रोखण्यासाठी जिल्हा वाहतूक शाखेमार्फत वेगवेगळे उपक्रम राबविले जात आहेत. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांना शिस्त लावण्यासाठी त्यांच्याविरोधात दंडात्मक कारवाई केली जाते. ठिकठिकाणी वाहतुकीच्या दहा सुवर्ण नियम फलकांद्वारे चालकांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न केला जातो.
रायगड जिल्ह्यामध्ये डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लाखो पर्यटक दाखल होणार आहेत. पर्यटकांची अलोट गर्दी जिल्ह्यात होणार आहे. पर्यटकांचा प्रवास सुखकर व आरामदायी व्हावा, म्हणून रायगड पोलिसांकडून वारंवार वाहतूकीच्या नियमांचे पालन करण्यास सांगितले जातात. रायगड पोलीस दलाच्या अखत्यारित 28 पोलीस ठाणे आहेत. या पोलीस ठाण्यांपैकी 15 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत जिल्ह्यामध्ये 45 ब्लॅक स्पॉट (अपघात प्रवण क्षेत्र) आहेत. त्यात द्रुतगती महामार्गावर आठ, राष्ट्रीय महामार्ग 66 वर 25, राष्ट्रीय महामार्ग 48 वर पाच, राष्ट्रीय महामार्ग 548 अ वर तीन, राष्ट्रीय महामार्ग 166 ए आणि डी वर तीन, राष्ट्रीय महामार्ग 753 एफवर एक या अपघात प्रवण क्षेत्राचा समावेश येतो. सर्वात जास्त प्रवणक्षेत्र खोपोली, खालापूर, माणगाव, गोरेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत आहेत. या मार्गांवरून वाहनांची वर्दळ कायमच असते.
वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याने ब्लॅक स्पॉटवर मागील वर्षी जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत 149 अपघात झाले. हे अपघात रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. या अपघात प्रवण क्षेत्रातील अपघात रोखण्यासाठी वाहन चालकांना वाहन सुरक्षित चालविण्याचे संदेश दिले जात आहेत. वेग मर्यादा फलक लावणे, रब्लींग स्ट्रीप लावणे, दिशा दर्शक बोर्ड, स्पीड ब्रेकर लावणे अशा अनेक प्रकारच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. चालकांनी आपली सुरक्षितता राखण्यासाठी नियमांचे पालन करून वाहन चालविण्यात यावे, असे आवाहन जिल्हा वाहतूक शाखेकडून करण्यात आले आहे.
ब्लॅक स्पॉटवर दृष्टीक्षेप
पोलीस ठाणे - लोकेशन
राष्ट्रीय महामार्ग 48
खोपोली- टाटा पावर हाऊस, अंडा पॉईंट
खालापूर- कलोते, लोधीवली, वावंढळ फाटा
द्रुतगती महामार्ग
खोपोली - दहिवली गांव, ढेकू गांव,खोपोली एक्झिट,आडोशी गांव,दस्तुरी
खालापूर - मडप बोगदा ते लोधीवली
रसायनी - रिसवाडी, भातण भोगदा
राष्ट्रीय महामार्ग - 66
दादर सागरी - खारपाडा पूल,खरोशी फाटा
पेण - तरणखोप,रामवाडी ,वाशीफाटा
वडखळ - डोलवी
नागोठणे - सुकेळी खिंड, शेतपालस
कोलाड - पुई
माणगांव - कशेणे, ढालघर,तिलोरे,रेपोली
गोरेगाव - लोणेरे , टेमपाले,तळेगांव, लोणेरे बस स्थानक
महाड शहर - टेमपाले , गांधारपाले,वीर
पोलादपूर - चोलई, धामणदेवी, लोहारे,पार्ले
महाड तालुका - दासगांव
राष्ट्रीय महामार्ग 548 अ
कर्जत - कर्जत चारफाटा
खालापूर - शेमदीगांव, कारगांव चावणी
राष्ट्रीय महामार्ग 166 डी
पेण - वाक्रूळ, सावरसई ते सीएनजी
राष्ट्रीय महामार्ग - ए
पोयनाड - धरमतर
राष्ट्रीय महामार्ग 753 एफ
माणगांव - कोंडेथार कारवा
वाहनतळ निर्मितीचा प्रश्न कायम
रायगड जिल्ह्यात वाढत्या औद्योगिकीकरणासह पर्यटनामुळे जिल्ह्यात वेगवेगळ्या भागातून येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढत आहे. रस्ते रुंदीकरणाची कामे जिल्ह्यात होत असली, तरीदेखील वाहनतळ निर्मितीचा प्रश्न कायमच आहे. जिल्ह्यातील महामार्गावर वाहन तळ निर्मितीचा अभाव असल्याने वाहन पार्कींग करताना चालकांना अनेक वेळा समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
खड्डे दुरुस्तीचा अभाव
मुंबई गोवा महामार्गासह वेगवेगळ्या मार्गावरील रुंदीकरणाची कामे युध्द पातळीवर सुरू आहे. मुंबई गोवा महामार्गावरील चारपदरीचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघात होण्याची भिती निर्माण झाली आहे. त्यामुळे गंभीर अपघात होण्याची भिती व्यक्त केली जात आहे.खड्डयांची दुरुस्ती तातडीने करून हा प्रश्न मार्गी लावणे गरजेचे आहे.
जिल्ह्यातील अपघात रोखण्यासाठी ब्लॅक स्पॉटची माहिती चालकांना दिली जात आहे. अपघात होऊ नये, यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी फलक लावून वाहनांचा वेग कमी करण्याबरोबरच नियमांचे पालन करण्याच्या सूचना केल्या जात आहे. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कारवाई केली जात आहे. महामार्गावरून प्रवास करताना वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे. वाहतूक नियमांचे पालन केल्यास वाहतूक कोंडी होणार नाही.
-अभिजीत भुजबळ
पोलीस निरीक्षक
जिल्हा वाहतूक शाखा, रायगड







