। पालघर । प्रतिनिधी ।
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील मनोर मस्तान नाका उड्डाणपूलावरून बेस ऑइल या पेट्रोलियमजन्य रसायनाने भरलेला टँकर उलटला. या अपघातात गंभीर जखमी असणार्या वाहन चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून पेट्रोलियमजन्य पदार्थाला आग न लागल्याने मोठा अनर्थ टाळला.
तुलनात्मक कमी ज्वलनशील अशा बेस ऑइलने भरलेला टँकर राष्ट्रीय महामार्गावरील मनोर येथील उड्डाणपूलावरून कोसळण्याची घटना रविवारी (दि. 30) संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात टँकरचालक आशिष कुमार यादव (28) गंभीर जखमी झाला. त्याच्यावर मनोर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असताना उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. टँकर उड्डाणपुलावरून सेवा रस्त्यावर कोसळण्याच्या वेळेस खाली कोणतेही वाहन किंवा नागरिक नसल्यामुळे सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. तसेच, टँकरमध्ये कमी प्रमाणात ज्वलनशील पदार्थ असल्याने गळती होऊन रस्त्यावर पसरले. अपघातानंतर काही प्रमाणात आग लागली मात्र ती स्थानिकांकडून विझवण्यात आली.