Crime News: जुन्या वादातून चालकाची हत्या

| पनवेल | प्रतिनिधी।

पनवेल गावाकडील जुन्या जातीय वादाचा आणि मारहाणीचा राग मनात धरुन ट्रक चालकाने आपल्या सहकारी चालकाची डोक्यात हत्याराने वार करुन निघृण हत्या केल्याची घटना तळोजा येथे घडली आहे. चंदन कपिलकुमार पांडे (45) असे मृत चालकाचे नाव असून, आरोपी रमेशकुमार स्वामीनाथ यादव (40) याच्या विरोधात तळोजा पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

मृत चंदन आणि आरोपी रमेशकुमार दोघेही मुळचे उत्तर प्रदेशचे असून, तळोजा नितळस येथील निशा ट्रान्सपोर्टमध्ये चालक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या गावात दोन्ही कुटुंबात जातीवरुन जुना वाद होता. याच वादातून चंदनने रमेशकुमारला मारहाण केली होती. याचाच बदला घेण्यासाठी रमेशकुमारने पार्किंग क्षेत्रात चंदनच्या डोक्यावर धारदार हत्याराने वार केले आणि तो फरार झाला. गंभीर जखमी चंदनला पनवेल उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. तळोजा पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, फरार आरोपीच्या शोधासाठी विशेष पथके रवाना केली आहेत.

Exit mobile version