अपघातानंतर पळून जाण्याचा चालकाचा प्रयत्न

। सिंधुदुर्ग । वृत्तसंस्था ।
आंबोलीच्या दिशेने चिर्‍याची वाहतूक करत असताना मोटारीला धडक देत पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेला डंपर पलटला. हा अपघात रात्रीच्या सुमारास बुर्डीपूल नजीकच्या वळणावर घडला. अपघातात डंपरसह चालक व अन्य दोघे किरकोळ जखमी झाले. मोटारीचे देखील नुकसान झाले आहे.
विश्‍वसनीय सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डंपर चालक हा आंबोलीच्या दिशेने चिरे वाहतूक करत होता. त्याच दिशेने भरधाव जात असताना आर्यनोवा थेटरजवळ आला असता त्याचा अचानक डंपरवरील ताबा सुटून समोरून येणार्‍या मोटारीला एका बाजूने धडक दिली. यात मोटारीचे मोठे नुकसान झाले.
या अपघातानंतर भयभीत झालेल्या चालकाने पळून जाण्याच्या प्रयत्न केला. मात्र भरधाव वेगाने जात असताना एक किलोमीटरच्या अंतरावरील वळणावर डंपर रस्त्याकडेला पलटी झाला.
या अपघातात चालकासह अन्य दोघे किरकोळ जखमी झाले. यात डंपरचेही मोठे नुकसान झाले आहे. डंपर मधील चिरे देखील पलटी झाल्यानंतर रस्त्याकडेला विखुरले. संबंधित डंपर हा ओव्हरलोड होता असे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे तर हा डंपर कर्नाटक पासिंगचा आहे.

Exit mobile version