| माथेरान | प्रतिनिधी |
दोन दिवसांपूर्वी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास ई-रिक्षा चार्जिंग स्टेशनवरील ई-रिक्षांवर अतिवृष्टीमुळे झाडाची मोठी फांदी पडल्यामुळे दोन ई-रिक्षांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नैसर्गिक आपत्तीचा भाग म्हणून संबंधित ई-रिक्षावाल्याना शासनाने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली जात आहे.
कष्टदायक हातरिक्षाच्या अमानवीय प्रथेतून एकूण 94 हातरिक्षापैकी सध्या वीस श्रमिकांना ई-रिक्षा मिळाल्यावर कुठेतरी ही श्रमिक मंडळी स्थिरस्थावर होऊन आपल्या कुटुंबाला आधार देण्याचा प्रयत्न करीत असतानाच 2 जुलै रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास शास्त्री हॉल येथील चार्जिंग स्टेशनवर वाऱ्याच्या झोकाने झाडाची एक मोठी फांदी थेट ई-रिक्षावर पडल्याने यातील कविता बल्लाळ आणि प्रकाश सुतार यांच्या दोन ई-रिक्षांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे काही दिवस दुरुस्ती अभावी या ई-रिक्षा बंद असणार आहेत. त्यामुळे त्यांची कौटुंबिक आर्थिक परिस्थिती नाजूक झाली असून, त्यांना नैसर्गिक आपत्ती म्हणून शासनाने योग्य ती नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली जात आहे.
एकूण वीस ई-रिक्षांपैकी पंधरा ई-रिक्षा शालेय विद्यार्थ्यांना नियमितपणे ने आण करीत असून, उर्वरीत पाच ई-रिक्षा पर्यटक आणि नागरिकांना सेवा उपलब्ध करून देतात. तर काही वेळा दोन ते तीन ई-रिक्षा खराब रस्त्यांमुळे नेरळ, पनवेल याठिकाणी दुरुस्तीसाठी नेल्या जातात. अशा परिस्थितीत प्रवाशांना सुविधा उपलब्ध करून देणे ही एकप्रकारे तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यासाठी राज्य शासनाने उर्वरित 74 परवाना धारक हातरिक्षा मालकांना ई-रिक्षा उपलब्ध करून दिल्यास सर्वच अडचणी दूर होऊन पर्यटन वाढीस मदत होईल, अशी मागणी ग्रामस्थ, पालक वर्ग, व्यापारी, शिक्षक करीत आहेत.
ई-रिक्षाला 10 जून रोजी एक वर्ष पूर्ण झाले. आम्ही नियमितपणे कर्जाचे हप्ते भरत आहोत. खराब रस्त्यांमुळे या वाहनांची सतत डागडुजी करावी लागते. त्यातच ही नैसर्गिक आपत्ती ओढवल्यामुळे आमची आर्थिक परिस्थिती बेताची बनली आहे. त्यासाठी स्थानिक प्रशासनाने नुकसान भरपाई द्यावी.
प्रकाश सुतार
ई-रिक्षा चालक







