चालू गाड्यांवर ई-चलनाची कारवाई
| उरण | प्रतिनिधी |
नेरुळ-उरण फाटा मार्गावर वाहतूक पोलिसांकडून चालू वाहनांवरच ई-चलन काढण्याची कारवाई होत असल्याचा प्रकार समोर आल्याने वाहनचालकांमध्ये संभ्रम आणि नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. अपोलो हॉस्पिटल ते उरण फाटा या व्यस्त मार्गावर ही कारवाई सुरू असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
वाहनचालकांच्या माहितीनुसार, काही वाहतूक पोलीस कर्मचारी वाहन थांबवण्याऐवजी वेगात धावणाऱ्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर थेट ई-चलन जारी करत असल्याचे दिसून आले. त्यामुळे ही कारवाई वाहतूक नियमांची अंमलबजावणी आहे की वाहनचालकांना धाक दाखवण्याचा प्रकार, असा सवाल उपस्थित केला जात आहे. या पद्धतीमुळे अपघाताचा धोका वाढू शकतो, अशी भीतीही काही वाहनचालकांनी व्यक्त केली आहे. काहींनी या प्रकाराचे मोबाईलवर चित्रीकरण केल्याचेही सांगितले जात आहे.
नेरुळ-उरण हा रायगड जिल्ह्यातील महत्त्वाचा व्यावसायिक मार्ग असल्याने दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून कारवाईची पद्धत स्पष्ट करावी, अशी मागणी नागरिक आणि स्थानिक व्यापारी संघटनांकडून करण्यात येत आहे.दरम्यान, यासंदर्भात वाहतूक पोलीस विभागाकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही.







