जिल्ह्यात पुन्हा पावसाचा शिडकावा

शेतकरी चिंतेत
अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
अलिबागसह रायगड जिल्ह्यातील अनेक भागात रविवारी ढगाळ वातावरण पसरले होते. तर अनेक ठिकाणी पावसाचा कमी अधिक प्रमाणात शिडकावा झाला. अचानक हवामानात झालेल्या बदलामुळे मांडवा ते गेटवे फेरी बोट सेवा दुपारनंतर बंद करण्यात आली. त्याचा परिणाम अलिबाग पनवेल खाजगी वाहतुकीवर झाला.
गेले तीन चार दिवस हवामान खात्याने राज्यात अनेक ठिकाणी येलो अलर्ट जारी केला आहे. रायगडसह मुंबई, पुणे, ठाणे, पालघर, नंदुरबार, धुळे, नाशिक, अहमदनगर, बीड, लातूर, नांदेड, सोलापूर, उस्मानाबाद, सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 19 जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी केला होता.
नैऋत्य मोसमी वारे देशातून परतून जवळपास एक महिना उलटून गेला आहे. तरीही यावर्षी महाराष्ट्रासह दक्षिण भारतात पावसाचा जोर कायम आहे.
दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्रात पावसाळा संपून उत्तरेकडील थंडीची लाट सुरू होते. पण यावर्षीचा हिवाळा मात्र याला अपवाद ठरला आहे. राज्यात अजूनही अनेक ठिकाणी किमान तापमानाचा पारा चढाच आहे. तर अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि अंदमान समुद्र परिसरात निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे अनेक ठिकाणांना पावसानं झोडपून काढलं आहे.
पुढील आणखी काही दिवस राज्यात पावसाची स्थिती कायम राहणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. पुढील तीन ते चार तासांत याठिकाणी विजांच्या कडकडाटासह वेगवान वार्‍यांच्या साथीनं जोरदार पावसाची शक्यता आहे


प्रवाशांचे हाल
संपामुळे एसटी वाहतूक ठप्प असल्याने खाजगी वाहतुकीवर ताण असून प्रवाशांनाही अव्वाच्या सव्वा भाडे देऊन प्रवास करावा लागत आहे. अलिबाग पनवेल मार्गासाठी एसटी चे तिकीट 75 रुपये असताना खाजगी वाहतूकदार मात्र 200 रुपये आकारत आहेत. उपप्रादेशिक परिवहन विभागाने तपासणी करून समज दिल्यावरही यावर काहीच परिणाम होत नसल्याने प्रवाशी नाराजी व्यक्त करीत आहेत.

Exit mobile version