द्रोणागिरी रस्त्याचे काम प्रगतीपथावर

। तळा । वार्ताहर ।

तळा तालुक्यातील प्रसिद्ध द्रोणागिरी देवस्थान रस्त्याचे काम प्रगती पथावर असून रस्त्याच्या सुविधेमुळे द्रोणागिरी यात्रेला नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता आहे. द्रोणागिरी डोंगरात वसलेल्या डोनोबाच्या यात्रेसाठी दरवर्षी एप्रिलमध्ये हनुमान जयंतीला भाविक आवर्जून येत असतात. याठिकाणी असलेल्या देव डोनोबा व देवी पद्मावतीचे दर्शन घेऊन देवाची लाट पाहण्यासाठी नागरिकांची एकच गर्दी उसळते. मात्र, याठिकाणी जाण्या-येण्यासाठी योग्य सुविधा नसल्याने भाविकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत होती. बहुतांश वयोवृद्ध नागरिकांना ईच्छा असूनही केवळ वाहतुकीची सुविधा नसल्याने यात्रेसाठी येता येत नव्हते. तसेच, हल्ली प्रखर उन्हातून पायी द्रोणागिरीला जाणे सर्वानाच शक्य नसल्याने बहुतांश नागरिक यात्रेला जाणे टाळतात. यामुळेच दरवर्षी भाविकांच्या संख्येत घट होत असल्याचे पहायला मिळत होते.

यावेळी एप्रिल महिन्यात असलेल्या द्रोणागिरी यात्रेच्या अगोदर हे रस्त्याचे काम पूर्ण व्हावे जेणेकरून जास्तीत जास्त भाविकांना डोंगरावर यात्रेसाठी जाता येईल, अशी अपेक्षा मंत्री महोदयांनी व्यक्त केली होती. तेव्हापासून या रस्त्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून जवळजवळ या रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. एप्रिल महिन्यात द्रोणागिरी यात्रा असून त्या आधी हे काम पूर्णत्वास गेल्यास तालुक्यासह दूर दूर वरून येणार्‍या भाविकांना डोंगरावर यात्रेला जाणे सोयीस्कर पडणार आहे.

Exit mobile version